मुंबई- ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘कांतारा’ या चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. मूळ कन्नड भाषेत असणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने चित्रपटाच्या शूटिंगबद्दलच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला. अभिनय हा या चित्रपटाचा सर्वांत अवघड भाग होता, असं ऋषभने सांगितलं. यातील ‘दैव कोला’चं शूटिंग करण्यापूर्वी ऋषभने खास प्रतिज्ञा केली होती. जवळपास 20 ते 30 दिवस आधीपासूनच त्याने मांसाहार खाणं सोडलं होतं. इतकंच नव्हे तर आगीच्या काठ्यांपासून मारण्याचा सीन खरा होता, हेदेखील ऋषभने स्पष्ट केलं. यामुळे त्याची पाठ भाजली होती.
कांतारा या चित्रपटाची कथा दक्षिण कन्नड या काल्पनिक गावात घडते. ही कथा एका कंबाला चॅम्पियनची आहे. हीच भूमिका ऋषभ शेट्टीने चित्रपटात साकारली आहे. हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट 30 सप्टेंबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला. कांतारामध्ये ऋषभसोबतच अच्युत कुमार आणि सप्तमी गौडा यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ म्हणाला, “अभिनयाचा भाग नक्कीच सर्वांत कठीण होता. त्यातील अॅक्शन सीक्वेन्सचं मोठं आव्हान होतं. विशेषत: दैव कोला सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान मला 50 ते 60 किलो वजन उचलावं लागलं होतं. त्या शूटिंगच्या 20-30 दिवस आधीपासून मी मांसाहार करणंही सोडलं होतं. दैव कोलाचे अलंकार परिधान केल्यानंतर, मी नारळ पाणीशिवाय काहीच खाऊ-पिऊ शकत नव्हतो. त्या सीक्वेन्सच्या शूटिंगच्या आधी आणि नंतर ते मला प्रसाद द्यायचे.”
“शूटिंगच्या अखेरपर्यंत मी अक्षरश: कोलमडून पडलो असतो. पण सेटवरील इतर लोकांची ऊर्जा कमी होऊ नये म्हणून मी उठून उभा राहायचो. शूटिंग करताना मी या अडचणींचा एवढा विचार केला नव्हता. आता जेव्हा मुलाखतींमध्ये मला प्रश्न विचारले जात आहेत, तेव्हा मला त्या सर्व गोष्टी आठवत आहेत. मला आगीच्या काठ्यांनी मारण्याचा सीनसुद्धा खरा होता. त्यात माझी पाठ भाजली होती. ते सर्वांत वेदनादायी शूटिंग होतं. पण मी ठाम होतो की मला त्या गोष्टीचं शूटिंग करायचंच आहे”, असं ऋषभने सांगितलं.
जागतिक बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा टप्पा पार करणारा ‘कांतारा’ हा तिसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. फक्त 15 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. 2022 मध्ये सर्व भाषांमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्येही कांताराचा समावेश आहे.