मुंबई- ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, लिखित आणि अभिनीत ‘कांतारा’ हा या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरला. सुरुवातीला हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांनी त्याचं इतर भाषांमध्ये डबिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतोय. बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यशानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘कांतारा’चा धमाका पहायला मिळणार आहे.
सोशल मीडियावरील ‘कांतारा’ची चर्चा पाहिल्यानंतर अनेकांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला. मात्र अद्याप तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल किंवा पुन्हा पाहायची इच्छा असेल तर ओटीटी प्रदर्शनाची तारीख लक्षात ठेवा.
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार अशी चर्चा होती. मात्र थिएटरमध्ये चित्रपटाला अजूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी ही तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट पुढच्याच आठवड्यात म्हणजेच येत्या 24 नोव्हेंबर रोजी ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे.
निर्मात्यांनी अनेकदा ओटीटी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र आता त्यांनी 24 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केल्याचं समजतंय. याबद्दल अद्याप त्यांच्याकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. ‘कांतारा’ हा चित्रपट या वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.
ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. केजीएफ-चाप्टर 1 आणि चाप्टर 2 या दोन्ही चित्रपटांना ‘कांतारा’ने चांगली टक्कर दिली आहे. या चित्रपटाच्या हिंदी आणि तेलुगू व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये या वनदेवतेला खूप महत्त्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केले जातात.
‘कांतारा’ची वेगळी कथा आणि त्याचं सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. नेहमी दाखवण्यात येणाऱ्या त्याच त्याच कथांपेक्षा अत्यंत वेगळी अशी ‘कांतारा’ची कथा आहे आणि हेच या चित्रपटाच्या यशामागचं मुख्य कारण आहे.