अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’चा मंच गाठला होता. या शोमध्ये सूरजने त्याच्या साध्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. लहानपणीच आई-वडिलांना गमावलेल्या सूरजला कोणाचाच आधार नव्हता. यामुळे तो त्याचं शिक्षणसुद्धा पूर्ण करू शकला नव्हता. टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्सद्वारे त्याला सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळाली. मात्र यात काहींनी त्याची फसवणूकसुद्धा केली. आता भविष्यात अशी फसवणूक होऊ नये म्हणून अभिनेता रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी 5’ विजेता सूरज चव्हाणची मोठी मदत केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सूरजने याविषयीचा खुलासा केला आहे.
बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजने सूत्रसंचालक रितेशला मिठी मारली. “तुम्ही शोमध्ये आहात म्हणून मी बिग बॉससाठी होकार दिला”, असं सूरजने रितेशला म्हटलं होतं. भारतात टिकटॉकवर बंदी येण्यापूर्वी सूरज त्यावर आपले विविध व्हिडीओ पोस्ट करत होता. त्याचे व्हिडीओ खूप व्हायरल व्हायचे आणि त्यावेळी तो जवळपास 80 हजार रुपयांच्या घरात कमाई करत होता. मात्र अनेकांनी त्याची फसवणूक केली होती. हे जेव्हा रितेशला समजलं तेव्हा सूरजची अशी फसवणूक भविष्यात होऊ नये यासाठी त्याने मोठं पाऊल उचललं.
याविषयी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सूरज म्हणाला, “रितेश सरांनी माझी खूप मोठी मदत केली. त्यांनी मला त्यांच्या जवळचा एक पीए दिला. आता सगळ्या गोष्टी नीट समजून घे, असं ते म्हणाले. मी एक माणूस देतो, तू त्याच्या नेहमी संपर्कात राहा, असं ते म्हणाले.” निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांना मात देत सूरजने ‘बिग बॉस मराठी 5’चं विजेतेपद पटकावलं आहे. रविवारी (6 ऑक्टोबर) या सिझनचा ग्रँड फिनाले धूमधडाक्यात पार पडला. यावेळी हा फिनाले बघण्यासाठी रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसुद्धा तिथे पोहोचली होती. ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली होती.