मुंबई : 19 फेब्रुवारी 2024 | अभिनेता रितेश देशमुखने 2022 मध्ये ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यामध्ये रितेशने पत्नी जिनिलिया देशमुखसोबत मुख्य भूमिकासुद्धा साकारली होती. ‘वेड’ने अनेक पुरस्कारसुद्धा आपल्या नावे केली आहेत. आता ‘वेड’च्या यशानंतर रितेश पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून एका चित्रपटासाठी काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं तो दिग्दर्शन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘राजा शिवाजी’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
‘इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तीनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे. शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’, अशी पोस्ट लिहित रितेशने चित्रपटाची घोषणा केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासोबतच रितेश त्यात मुख्य भूमिका साकारणार असल्याचंही कळतंय. या चित्रपटाविषयी कळताच रितेशला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची निर्मिती मुंबई फिल्म कंपनीसोबत जियो स्टुडिओजकडून करण्यात येणार आहे. रितेशने या खास चित्रपटासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते संतोष सिवन यांची निवड केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने संतोष हे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.