“त्यांचं पुढच्या वेळेचं डिपॉझिट आताच..”; भावाच्या प्रचारादरम्यान रितेश देशमुखचं लातूरकरांना आवाहन

| Updated on: Nov 11, 2024 | 9:52 AM

लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आणि भाऊ धीरज देशमुख यांच्यासाठी रितेशने प्रचारसभा घेतली. या सभेत त्याने लातूरकरांना आवाहन केलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड उमेदवार आहेत.

त्यांचं पुढच्या वेळेचं डिपॉझिट आताच..; भावाच्या प्रचारादरम्यान रितेश देशमुखचं लातूरकरांना आवाहन
Dhiraj and Riteish Deshmukh
Image Credit source: Instagram
Follow us on

विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यानिमित्त राज्यात सध्या प्रचारांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने भाऊ आणि काँग्रेस-महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. लातूरमधल्या या प्रचारसभेत त्याने युवकांशी संवाद साधला. धीरज देशमुख यांना भरघोस मतदान करून विजयी करावं, असं आवाहन त्याने यावेळी केलं. मंचावर बोलताना रितेशने विरोधकांवरही निशाणा साधला. “यावेळी एवढ्या जोरात बटण दाबा की पुढच्या वेळेचं डिपॉझिट आताच जप्त झालं पाहिजे त्यांचं”, अशा शब्दांत त्याने लातूरकरांना आवाहन केलं.

काय म्हणाला रितेश?

“हा आपला गडी आहे. या गड्याला तुम्ही मतदान करा, हा नेहमी तुमच्यासोबत राहील. एक लाख मतांनी तुम्ही त्यांना विजयी केलं होतं. गेली पाच वर्षे इतक्या प्रामाणिकपणे धीरजने काम केलंय.. सतत.. मुंबई असो, लातूर ग्रामीण असो.. मी पाहिलंय. आम्ही घरी असतानासुद्धा सांगायचा की, दादा मी चाललोय, गावाकडे कार्यक्रम आहे, लोकांची कामं करायची आहेत. ही जी मनाची चढाओढ असते ना की लोकांचं आपल्याला काम करायचं आहे, लोकांच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला पुसायचे आहेत, आपल्या आई-बहिणींचा जो त्रास आहे तो कमी करायचा आहे,” असं रितेश म्हणाला.

हे सुद्धा वाचा

सरकारवर निशाणा साधत तो पुढे म्हणाला, “आज आपले युवक लातूर पॅटर्नमध्ये शिक्षण घेतायत, पण रोजगार आहे का तुमच्या हाताला आज? रोजगार द्यायची जबाबदारी कोणाची? ही सरकारची जबाबदारी आहे. आहे का तुमच्याकडे रोजगार? पिकापाण्याला भाव आहे का? येत्या वीस तारखेला, जे बटण तुम्ही दाबणार आहात ना, खरंच म्हणाले.. की यात एक आमदार तर होणारच आहे. आता जे विरोधक आहे तेही आमदार आहेच, त्यांना या बटणची गरज नाही. दोन-दोन आमदार मिळतीलच तुम्हाला एका बटणात. गेल्या वेळेस एक लाखाची लीड होती. पण यावेळी एवढ्या जोरात बटण दाबा की पुढच्या वेळेचं डिपॉझिट आताच जप्त झालं पाहिजे त्यांचं.”

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे आमदार धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड उमेदवार आहेत. 2019 मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारसंघात फिरकला नसल्याने काँग्रेससाठी ही एकतर्फी निवडणूक झाली होती. यानंतर भाजपने 2020 मध्ये रमेश कराड यांना विधान परिषदेवर संधी दिली. यामुळे मतदारसंघात दोन आमदार झाले.