आपल्या आईची हत्या केल्याप्रकरणी 24 वर्षीय हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम (Ryan Grantham) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रायनने नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध ‘रिव्हरडेल’ (Riverdale) या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली होती. रायनवर स्वत:च्या आईची हत्या केल्याचा आरोप आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने कोर्टासमोर स्वत:ला दोषी मानलं होतं. त्यानंतर आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, रायन त्याच्या आयुष्यात कधीच बंदुकीचा वापर करू शकत नाही. त्याचसोबत त्याला तुरुंगातील 14 वर्षांत पॅरोलची परवानगी देण्यात येणार नाही.
कॅनडामधील व्हॅनकुव्हर इथल्या ब्रिटिश कोलंबिया सुप्रीम कोर्टाने रायनला ही शिक्षा सुनावली. मार्च 2020 मध्ये रायनने त्याच्या 64 वर्षीय आईची गोळी झाडून हत्या केली होती. त्याची आई बारबरा वेट पियानो वाजवत होती, तेव्हा रायनने त्यांच्यावर गोळी झाडली. सीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी निकाल सुनावताना या घटनेला अत्यंत दु:खद, हृदय पिळवटून टाकणारा आणि आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारा म्हटलंय.
रायनचे वकील यांनी जूनमध्ये सांगितलं होतं की रायनने 31 मार्च 2020 रोजी त्याच्या आईची हत्या केली होती. त्याचा व्हिडीओसुद्धा त्याने बनवला होता. गो प्रो कॅमेरावर शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये रायन त्याच्या आईच्या मृतदेहाजवळ उभा राहून हत्येची कबूल देताना दिसला होता. “मी मागून त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली होती. वळून पाहिल्यावर त्यांना समजलं की मीच ती गोळी झाडली होती”, असं तो व्हिडीओत म्हणताना दिसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या हत्येनंतर रायनने बिअर आणि गांजा खरेदी केला होता. त्यानंतर त्याने कॉकटेल बनवण्याचा प्रयत्न केला आणि नेटफ्लिक्स पाहिला. हे सर्व करून झाल्यानंतर त्याने आईचा मृतदेह कपड्याने झाकला आणि त्यानंतर तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर रायनने त्याच्या आईच्या पियानोवर रोजरी ठेवली आणि मृतदेहाच्या चारही बाजूंना मेणबत्ती पेटवली. त्यानंतर तो दुसऱ्या हत्येसाठी घरातून निघाला होता.
रायनने त्याच्या गाडीमध्ये तीन लोडेड गन, कॉकटेल, दारुगोळा आणि कॅम्पिंगचं सामान ठेवून ओटावाच्या रिडो कॉटेजचा मॅप सुरू केला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मारण्याचा त्याचा प्लॅन होता. जस्टिन आणि त्यांचं कुटुंब रिडो कॉटेजमध्ये राहतात. नंतर रायनने स्वत: पोलिसांकडे या गोष्टीची कबुली दिली होती. याविषयी त्याने त्याच्या डायरीमध्येही लिहिलं होतं.
रायन हा जस्टिन ट्रुडो यांच्या घरीच्या दिशेने निघाला होता. यानंतर त्याने विचार केला की तो सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी किंवा व्हॅनकुव्हरमधील लायन्स गेट ब्रिज याठिकाणी सामूहिक शूटिंग करेल. इथूनच रायनने त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र त्याने या दोघांपैकी काहीही न करता व्हॅनकुव्हर पोलिसांकडे जाऊन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. ‘मी माझ्या आईला मारलं आहे’, असं त्याने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं.