‘एमटीव्ही रोडीज’ हा रिॲलिटी शो 2000 पासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीत फार लोकप्रिय आहे. सुरुवातीच्या काळात या शोचा मोठा चाहतावर्ग होता. मात्र गेल्या काही वर्षांत ‘एमटीव्ही रोडीज’ची लोकप्रियता बऱ्याच अंशी कमी झाली आहे. या शोच्या दहा सिझन्समध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या रघु रामने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यावर बरीच टीका केली आहे. रघु आणि त्याचा भाऊ राजीव यांनी ‘एमटीव्ही रोडीज’च्या दहा सिझन्सचं परीक्षण केलं होतं. “ज्यादिवशी मी आणि माझ्या भावाने तो शो सोडला, तेव्हाच तो संपला. या शोमुळे माझ्या खासगी आयुष्यावर खूप वाईट परिणाम झाला”, असा आरोप त्याने केला. रोडीजमुळे पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचंही त्याने म्हटलंय.
एमटीव्हीसोबत असलेल्या मतभेदांबद्दल बोलताना रघु म्हणाला, “मी वैतागलो होतो. हा शो यशाच्या शिखरावर असताना मी त्यातून काढता पाय घेतला होता. यामागे दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे एमटीव्हीला तो शो एका विशिष्ट पद्धतीने चालवायचा होता आणि त्यांच्याशी मी सहमत नव्हतो. दहाव्या सिझनपर्यंत निर्णय घेण्याची मला बरीच मोकळीक होती. पण नवव्या आणि दहाव्या सिझनपासूनच माझे एमटीव्हीसोबत मतभेद होऊ लागले. त्यांना लोकप्रियतेसाठी विशिष्ट अँगल हवा होता. जे मला मान्य नव्हतं.”
रघुने त्याच्या घटस्फोटासाठी ‘एमटीव्ही रोडीज’ या शोला कारणीभूत ठरवलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “दुसरं कारण म्हणजे रोडीजमुळे माझ्या खासगी आयुष्यात बरेच चढउतार येत होते. माझ्या वैवाहिक आयुष्यात या समस्या होत्या. अखेर त्याचं रुपांतर घटस्फोटाच्या निर्णयात झालं होतं. माझं मानसिक, शारीरिक आरोग्य आणि इतर सर्वकाही बिघडलं होतं. मला एक पाऊल मागे घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्याचं मला खूप समाधान आहे. त्याचा मला एकही दिवस पश्चात्ताप झाला नाही.”
रघु रामने अभिनेत्री सुगंधा गर्गशी लग्न केलं होतं. 2016 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. एमटीव्हीने रघु आणि त्याचा भाऊ राजीव यांना शोमध्ये परतण्याची विनंती केली होती. मात्र पुन्हा शोमध्ये जाण्याचा कोणताच निर्णय नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. “नाही, हे आता पुन्हा घडणारच नाही. आम्हाला विचारण्यात आलं होतं. पण मला तो शो पुन्हा करायचा नाही. मी शो सोडल्यानंतर मला तो कधी दिसलाच नाही. आता ‘त्या’ रोडीजची मजा उरली नाही. आताचा शो हा पूर्णपणे वेगळा आहे. फक्त त्याचं नाव तेच आहे. ज्यादिवशी मी आणि राजीवने शोमधून काढता पाय घेतला, तेव्हाच सगळं संपलं होतं. शोचा विशिष्ट फॉरमॅटसुद्धा तेव्हाच संपला होता”, असं रघुने सांगितलं.