मुंबई | अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये तुफान रंगत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमा बॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. सिनेमात रणवीर आणि आलिया मुख्य भूमिकेत असले तरी, दिग्दर्शक करण जोहर याच्यासाठी सिनेमा अधिक महत्त्वाचा आहे. कारण तब्बल सात वर्षांनंतर करण जोहर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकताच करण जोहर याने सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला होता. आता सिनेमाचं रोमाँटिक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिनेमातील ‘तुम क्या मिले’ गाणं प्रदर्शित झालं आहे. गाणं समोर येताच अभिनेता रणवीर सिंग याची पत्नी दीपिका पादुकोण हिची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘गली बॉय’ सिनेमाच्या यशानंतर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून प्रेक्षकांनी आलिया आणि रणवीर यांच्यातील खास केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमातील ‘तुम क्या मिले’ गाण्याला गायक अरिजीत सिंग आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला आहे.
‘तुम क्या मिले’ गाण्यातील आलिया आणि रणवीर यांची केमिस्ट्री पाहिल्यानंतर चाहत्यांना अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांची आठवण आली आहे. अशात ‘तुम क्या मिले’ गाणं पाहिल्यानंतर दीपिका पादुकोण हिने एका जीआयएफचा वापर करत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. शिवाय आलिया आणि रणवीर यांना टॅग देखील केलं आहे.
सध्या सर्वत्र आलिया आणि रणवीर यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाचा टीझर आणि पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर चाहते ट्रेलरच्या प्रतीक्षेत आहेत. आलिया भट्ट मुलगी राहा कपूर हिच्या जन्मानंतर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. म्हणजे आलियाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड आनंदी आणि उत्साही आहेत.
राहा कपूर हिच्या जन्मानंतर अभिनेत्री आलिया भट्ट सतत चर्चेत असते. आलिया हिने फार कमी कालावधीत झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. ‘स्टुडंन्ट ऑफ द ईयर’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्ट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. चाहते कायम आलियाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.