मुंबई | 31 जुलै 2023 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडची परीक्षा पास केली आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून रविवारी जवळपास 19 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. वीकेंडच्या दृष्टीने कमाईचा हा आकडा समाधानकारक आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीरसोबतच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, तोता रॉय चौधरी, चर्नी गांगुली आणि आमिर बशीर यांच्याही भूमिका आहेत.
पहिला दिवस- 11.1 कोटी रुपये
दुसरा दिवस- 16.05 कोटी रुपये
तिसरा दिवस- 19 कोटी रुपये
एकूण- 46 कोटी रुपये
या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. तर 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटानंतर आलिया आणि रणवीरने पुन्हा एकत्र काम केलं. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन स्वीकारलं आहे.
रणवीर या चित्रपटात रॉकी रंधावाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने 25 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं कळतंय. तर आलिया यामध्ये रानी चॅटर्जीच्या भूमिकेत आहे. आलियाने 10 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी रॉकीच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना दीड कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर जया बच्चन या रॉकीच्या आजीच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. रानीच्या आजीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री शबाना आझमी यांनीसुद्धा एक कोटी रुपये फी घेतली आहे.
या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. या चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्द, एका दारुच्या ब्रँडचं नाव आणि त्याचसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाशी संबंधित एक संपूर्ण डायलॉग हटवण्यास सांगितलं होतं. यातील एका सीनमध्ये ‘ओल्ड माँक’ या रम ब्रँडचा उल्लेख आहे. त्याचं नाव बदलून ‘बोल्ड माँक’ असं ठेवलंय. यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित एक सीन होता. हा सीन ट्रेलरमध्येही पहायला मिळाला होता. या सीनमधील एका शब्दाला काढून त्या जागी एखादा फिल्टर टाकण्यास सांगितलं गेलंय.