मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; अंतरवाली सराटीमध्ये शूटिंगला सुरुवात

| Updated on: Jan 19, 2024 | 1:01 PM

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता रोहन पाटील मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी शूटिंगला सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर; अंतरवाली सराटीमध्ये शूटिंगला सुरुवात
Movie on Manoj Jarange Patil
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 19 जानेवारी 2024 | मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध आगामी ‘संघर्षयोद्धा’ मनोज जरांगे पाटील या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी याठिकाणी सुरू झालं आहे. यावेळी स्वतः मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपटाची टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या 26 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे ‘संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारत असलेले रोहन पाटील, अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. तर सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभळली आहे. चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील.

आंदोलनं, उपोषणं करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त़्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे. सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर येणार आहे.