हैदराबाद: दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीला नुकतंच हैदराबादमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सेटवर त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. “इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान शुक्रवारी रात्री रोहित शेट्टीच्या बोटाला दुखापत झाली. ॲक्शन सीनचं शूटिंग करताना हे घडलं. या दुखापतीवर तातडीने उपचार करण्यात आले आणि घटनेच्या काही वेळानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली”, अशी माहिती रोहितच्या टीमकडून देण्यात आली.
हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये या सीरिजचं शूटिंग सुरू होतं. रोहित शेट्टीच्या या आगामी वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्या मुख्य भूमिक आहेत. ही सीरिज ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत या सीरिजचं शूटिंग पार पडलं.
या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. इंडियन पोलीस फोर्सच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि रोहित शेट्टी हे वेब विश्वात पदार्पण करत आहेत.
“या सीरिजला खूप मोठं बनवायचं, हे एकच माझं ध्येय आहे. आपण परदेशातल्या अनेक सीरिज पाहतो. त्यात चुकीचं काहीच नाही, पण भारतातही अशा सीरिज बनायला हव्यात आणि मला हेच करायचं आहे. इंडियन पोलीस फोर्स ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी त्यावर काम करतोय”, असं रोहित या सीरिजबद्दल म्हणाला होता.
या वेब सीरिजशिवाय रोहितचा ‘सिंघम 2’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही महिला पोलिसाची भूमिका साकारणार आहे. ‘सर्कस’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रोहितने याची घोषणा केली होती.
रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नाही. यामध्ये रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे यांच्या मुख्य भूमिका होत्या.