गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट यांच्यात अनेकांकडून तुलना केली जात आहे. ‘पुष्पा’, ‘RRR’, ‘केजीएफ 2’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर बॉलिवूड (Bollywood) अशा चित्रपटांना टक्कर देऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. यावर बॉलिवूडमधल्या अनेकांनी मतं मांडली. दिग्दर्शक रोहित शेट्टीसुद्धा (Rohit Shetty) याविषयी व्यक्त झाला. देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांविषयी वाढत असलेली लोकप्रियता याला बॉलिवूडचा अंत म्हणून समजू नये, असं तो म्हणाला. हिंदी आणि साऊथ फिल्म्समध्ये (South Film Industry) कोणतीही तुलना करता येऊ शकत नाही, असंही त्याने म्हटलं. रोहित शेट्टीची ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या प्रमोशननिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्याला बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील तुलनेविषयी प्रश्न विचारला गेला.
“बॉलिवूड कधीच संपुष्टात येणार नाही. ऐंशीच्या दशकात जेव्हा व्हीसीआर आले, तेव्हा थिएटर संपुष्टात येईल असं लोक म्हणत होते. तेव्हासुद्धा बॉलिवूड संपणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता ओटीटीच्या काळातही पुन्हा तेच झालं. बॉलिवूड कभी खत्म नहीं होगा (बॉलिवूड कधीच संपणार नाही)”, असं रोहित म्हणाला. याआधी अक्षय कुमार, करण जोहर, संजय दत्त यांसारख्या कलाकारांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
“तुम्ही जेव्हा इतिहास पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पन्नास, साठच्या दशकापासून दाक्षिणात्य चित्रपट अस्तित्वात आहेत. शशी कपूर यांचा ‘प्यार किये जा’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. ऐशीच्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना हे करिअरच्या शिखरावर होते, तेव्हा कमल हासन सर यांची एण्ट्री झाली. त्यांचा एक दुजे के लिए हा चित्रपट तुफान गाजला. श्रीदेवी, जय प्रदा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी दाक्षिणात्य चित्रपटांमध्येच काम केलं होतं”, असं तो पुढे म्हणाला.
रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांच्या भूमिका आहेत. याशिवाय त्याचा ‘सर्कस’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.