मुंबई : मुसळधार पाऊस आणि पुराने उत्तर भारताला झोडपलं आहे. याचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. भूस्खलनामुळे तिथले अनेक रस्ते बंद झाले आहेत तर काही भागांचा संपर्क तुटला आहे. रस्ते, गाड्या, घरं पुरात वाहून गेले आहेत. अनेकांनी यात आपले प्राण गमावले आहेत. हिमाचल प्रदेशमधील पूरपरिस्थितीवर आता टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने चिंता व्यक्त केली आहे. रुबिनाचे कुटुंबीय हिमाचलमध्ये राहतात. गेल्या बऱ्याच काळापासून तिचा कुटुंबीयांशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे ती चिंतेत होती. मात्र संपर्क झाल्यानंतर ते सुरक्षित असल्याची माहिती तिला मिळाली आहे.
रुबिना ही मूळची हिमाचल प्रदेशातील शिमला इथली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यासाठी ती मुंबईला आली, मात्र तिचे कुटुंबीय तिथेच राहतात. टीव्हीवर दाखवण्यात येणारी पुराची भयाण दृश्ये पाहून रुबिना फार घाबरली. हिमाचलमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांविषयी सतत काळजी वाटत असल्याचं तिने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी व्यक्त झाली. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत रुबिना म्हणाली, “टीव्हीवर दाखवण्यात येणारी दृश्ये खूप भयावह आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा तिथे नेटवर्क नव्हता, तेव्हा तासनतास मी कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत नव्हती. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटत होती. सुदैवाने माझा आता त्यांच्याशी संपर्क होऊ शकत आहे आणि ते सर्वजण ठीक आहेत.”
“आमचं घर डोंगरावर आहे. त्यामुळे काही काळ ते तिथे सुरक्षित आहेत. मात्र भूस्खलनामुळे नुकसानसुद्धा होत आहे. आतापर्यंत त्यांचं मोठं असं नुकसान झालेलं नाही. पण मला आशा आहे की तिथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल”, असं तिने सांगितलं. तर दुसरीकडे अभिनेता रुसलान मुमताज हा मनालीतील पुरात अडकला आहे. आगामी वेब सीरिजच्या शूटिंगनिमित्त तो मनालीला गेला होता. मात्र पुरामुळे तो तिथेच अडकला आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत रुसलानने तिथली परिस्थिती नेटकऱ्यांना सांगितली आहे. रिसॉर्टमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे तो सध्या छोट्याशा गावातील शाळेत थांबला आहे.
रुसलानने सांगितलं की जेव्हा तो 4 जुलै रोजी मनालीला शूटिंगसाठी गेला होता तेव्हा तो तिथल्या एका रिसॉर्टमध्ये थांबला होता. तिथेच त्याच्या सीरिजची शूटिंग सुरू होती. मात्र 9 जुलैपासून तिथली परिस्थिती बिघडू लागली. मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मनालीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि रिसॉर्टच्या आत पाणी शिरलं.