मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं अशी प्रत्येक मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील करत असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणाऱ्या काही व्यक्तींना लवकर यश मिळतं, तर काहींना मात्र दिर्घ काळ प्रतीक्षा करावी लागते. पण ‘ये है मोहब्बतें’ फेम रुही म्हणजे अभिनेत्री रुहानिका धवन (Ruhaanika Dhawan) हिने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने १५ व्या वर्षात स्वतःचं घर खरेदी केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद सर्वांसोबत शेअर केला.
पण आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर करणं रुहानिकाला महागात पडलं आहे. नव्या घराचे फोटो आणि पोस्ट लिहिल्यानंतर रुहानिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनेकांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं, तर दुसरीकडे अनेकांनी तिला ट्रोल करत तिच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
एका मुलाखतीत रुहानिका म्हणाली, ‘माझ्या आई-वडिलांवर बाल मजूरीसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.’ पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी कधीही सोशल मीडियावर कमेंट करत नाही. कारण मला माहित आहे मी असं केलं, तर मला दुःख होईल. मी याला बाल मजूरी म्हणणार नाही. कारण गेल्या ४ ते ५ वर्षात मी कोणत्याच मालिकेत काम केलेलं नाही.’
‘जर तुम्ही माझे इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरील व्हिडीओ पाहिले तर तुम्हाला कळेल मला व्हिडीओ रेकॉर्ड करायाला आवडतात. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी माझ्या आवडीने करते, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
रुहानिकाने स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी जवळपास ८ वर्ष पैश्यांची बचत केली. रुहानिकाची आई म्हणते, ‘कोणत्याही मुलावर दबाव टाकू नका. मी योग्यपद्धतीने पैसे गुंतवले आणि रुहानिकाने फक्त एक टीव्ही शो केले आणि खूप पैसे कमावले असे नाही. ही देवाची इच्छा होती आणि सर्व काही ठीक झालं.’ असं देखील रुहानिकाच्या आई म्हणाल्या. सध्या रुहानिका तिच्या घरामुळे चर्चेत आहे.