‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हे दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नापूर्वी ‘मोदक’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रथमेशनं फेसबुकवर पोस्ट लिहित मुग्धासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांच्या लग्नाला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्त मुग्धा आणि प्रथमेशने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यावर कमेंट करताना काही युजर्सनी मुग्धाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशा ट्रोलर्सना प्रथमेशने खास कोकणी स्टाइलने उत्तर दिलं आहे.
‘कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. हेची घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे,’ अशी पोस्ट मुग्धाने लिहिली. त्यासोबतच प्रथमेशसोबतचे फोटोसुद्धा तिने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मुग्धाने साडी नेसली असून प्रथमेशने कुर्ता परिधान केला आहे.
मुग्धाच्या फोटोंवर कमेंट करताना एकाने लिहिलं, ‘काकू झाली आहे टिपिकल बाई’. या कमेंटवर मुग्धानेही जशास तसं उत्तर दिलं आहे. संबंधित युजरला टॅग करत मुग्धाने लिहिलं, ‘कौतुक केल्याबद्दल धन्यवाद, आजी.’ तर प्रथमेशनेही संबंधित युजरला टॅग करत कोकणी स्टाइलने उत्तर दिलं आहे. ‘आमच्या कोकणात एक म्हण आहे. ‘माकड म्हणतं आपलीच लाल’ फक्त सांगितलं. बाकी मनात काही नाही आजी,’ असं त्याने लिहिलंय.
सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच मुग्धा आणि प्रथमेशची पहिल्यांदा भेट झाली आणि शोनंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रमही झाले. या कार्यक्रमांदरम्यान दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू दोघांच्या मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. एकदा कार्यक्रमाची तालीम सुरु असताना दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं.
सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता पती-पत्नीपर्यंत येऊन पोहोचला आहे. आपल्या सुरेल आवाजाने घराघरात पोहोचलेल्या दोन सूरवीरांनी एकमेकांचा पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. प्रथमेश आणि मुग्धा हे सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये टॉप 5 पर्यंत पोहोचले होते.