मुंबई : ‘सडक २’ आणि ‘बाटला हाउस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री क्रिसन परेरा हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. क्रिसन परेरा हिला संयुक्त अरब अमिरातीमध्ये अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीत अभिनेत्रीचं नाव आल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. क्रिसन ही शारजाह सेंट्रल जेलमध्ये कैद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रिसन जवळपास दोन आठवड्यांपासून तुरुंगात बंद आहे. भारतीय दूतावासाने अभिनेत्रीच्या अटकेची माहिती कुटुंबियांना दिली आहे. मात्र, या प्रकरणात अडकलेली क्रिसन ही आरोपी नसून पीडिता असल्याचा दावा अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. सध्या सर्वत्र क्रिसन हिचीच चर्चा सुरु आहे. आता प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, शारजाह विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमी क्रिसन हिला ताब्यात घेतलं. अभिनोत्रीला ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला अटक केल्यानंतर ७२ तासांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी तिच्याबद्दल माहिती देण्यात आली.
अभिनेत्रीला रवी नावाच्या व्यक्तीने फसवलं असल्याचा दावा क्रिसन हिच्या कुटुंबियांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम अभिनेत्री आई प्रेमिल परेरा यांच्याशी संपर्क साधला. अभिनेत्रीची आई म्हणाली, ‘रवी नावाच्या एका व्यक्तीने सांगितलं की, तो क्रिसन हिला एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी कास्ट करत आहे. आईने रवी याची ओळख क्रिसन हिच्यासोबत करुन दिली होती.
रवी आणि क्रिसन यांच्या काही भेटीनंतर दुबईत वेब सीरिजसाठी ऑडिशन होणार असल्याची माहिती दिली. एवढंच नाही तर, रवीने अभिनेत्रीसाठी दुबईत येण्या – जाण्याचा बंदोबस्त देखील केला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला दुबईसाठी उड्डान भरण्याआधी, रवीने क्रिसन हिच्याकडे एक ट्रॉफी दिली होती आणि शुटिंगचा भाग आहे.. असं सांगितलं.
विमानतळावर जेव्हा अभिनेत्रीला पडकण्यात आलं. तेव्हा त्याच ट्रॉफीमधून अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ ताब्यात घेतले. असं अभिनेत्रीच्या कुटुंबियांचं म्हणण आहे. यानंतर १० एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेत्रीवर ड्रग्ज तस्करीचे आरोप केले. दरम्यान, रवी नावाची व्यक्ती सध्या बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिसन हिच्या कुटुंबाने दुबईमध्ये एका वकीलाची याप्रकरणी निवड केली आहे.
क्रिसन हिच्या अडचणीतून सोडवण्यासाठी निवड केलेल्या वकिलांची फी तब्बल १३ लाख रुपये आहे. असं अभिनेत्रीच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर, क्रिसन हिला सुखरूप परत आणण्यासाठी घर गहाण ठेवण्याच्या तयारीत देखील कुटुंब आहे. महत्त्वाचं म्हणजे, तस्कर रवी याला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांत प्राथमिक एफआयआर दाखल करण्याच्या प्रयत्नात देखील अभिनेत्रीचं कुटुंब आहे. पण पोलीस यूएई सरकारकडून आरोपांच्या अधिकृत प्रतीची वाट पाहत असल्याची माहिती समोर येत आहे…