नवी दिल्ली : अभिनेत्री स्वरा भास्करने प्रियकर फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं. या लग्नामुळे ती जोरदार चर्चेत आहे. स्वराने 6 जानेवारी रोजी समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं. जवळपास 40 दिवसांनंतर तिने या लग्नाचा खुलासा केला. मात्र या लग्नावरून अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. फहाद आणि स्वराच्या आंतरधर्मीय लग्नावर आता भाजप नेत्या साध्वी प्राची यांनी टीका केली. “एकतर तिची लवकरच घरवापसी होईल किंवा तिचं श्रद्धा वालकरसारखं होईल. सुटकेस किंवा फ्रिजमध्ये ती सापडेल”, असं त्या म्हणाल्या.
साध्वी प्राची यांनी त्या तरुणींवर निशाणा साधला, ज्यांनी धर्म परिवर्तन करून आंतरधर्मीय निकाह केला. बरेलीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वरा भास्करवरही निशाणा साधला. “स्वरा भास्करचे आधीही सूर वेगळे होते. तिला श्रद्धाच्या फ्रिजची आठवण झाली पाहिजे, ज्यामध्ये 35 तुकडे मिळाले होते. नुकतीच निक्की नावाच्या मुलीसोबत अशीच घटना घडली. मुली त्यांचा मार्ग भरकटतात, मात्र त्याचं दु:ख मला होतं. एकतर ती सुटकेसमध्ये जाते किंवा एखाद्या फ्रीजमध्ये सापडते. स्वरा भास्करचीही सूचना लवकरच मिळेल. तिच्या घटस्फोटाची सूचना लवकरच मिळेल”, असं त्या म्हणाल्या.
साध्वी प्राची यांच्या या वक्तव्यावर अद्याप स्वराची प्रतिक्रिया समोर आली नाही. स्वराच्या लग्नाबाबत देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. स्वरा आणि फहाद लवकरच धूमधडाक्यात लग्न करणार आहेत. स्वराने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिची लव्ह-स्टोरी सांगितली.
स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये 2019 आणि 2020 मधील आंदोलनांची झलक पहायला मिळतेय. या आंदोलनातच दोघांच्या कहाणीची सुरुवात झाली. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला त्याच्या भावाच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती.
Sometimes you search far & wide for something that was right next to you all along. We were looking for love, but we found friendship first. And then we found each other!
Welcome to my heart @FahadZirarAhmad It’s chaotic but it’s yours! ♥️✨? pic.twitter.com/GHh26GODbm— Swara Bhasker (@ReallySwara) February 16, 2023
या व्हिडीओत पुढे दाखवलं गेलं की गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली. व्हिडीओमध्ये दोघं कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.