‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. यामध्ये प्रिती सबरवालची भूमिका साकारणारी अभिनेत्री सागरिका घाटगे विशेष प्रकाशझोतात आली होती. सागरिकाचा हा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातही काम केलं. करिअरच्या शिखरावर असताना सागरिकाने 2017 मध्ये भारतीय क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. झहीर खान आणि सागरिकाची जोडी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली. मात्र ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सागरिका तिच्या कमबॅकविषयी आणि इतरही काही मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर झहीर खानची पत्नी अशी ओळख निर्माण झाल्याविषयीही तिने प्रतिक्रियी दिली आहे.
लग्नानंतर सागरिका घाटगे म्हणून कमी आणि झहीरची पत्नी म्हणून अधिक ओळखलं जात असल्याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “लोक मला झहीर खानची पत्नी म्हणून ओळखतात, याचा मला अभिमान आहे. मी माझ्या आयुष्यातील लहान-सहान गोष्टींनाही खूप महत्त्व देते. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो, असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असता किंवा लग्न करता, तेव्हा त्या नात्याला तुम्ही प्राधान्य देता. मी झहीर खानची पत्नी असल्याचा मला खूप अभिमान आहे आणि लोक मला तसं ओळखत असतील तर मला आनंदच आहे.”
अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झहीर आणि सागरिकाची एकमेकांशी पहिल्यांदा भेट झाली होती. “आमच्या स्वभावात खूप साम्य आहे. त्यामुळे लग्नाच्या वेळी फारशा समस्या आल्या नव्हत्या. दोघांच्या कुटुंबीयांनीही साथ दिली होती. क्रिकेट असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, झहीरच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता असते. त्यामुळे आम्ही दोघांनी हे नातं पुढे नेण्याचा विचार केला होता,” असंही सागरिकाने सांगितलं.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील घाटगे घराण्यात सागरिकाचा जन्म झाला. लहाणपणापासून तिला कलेची आवड होती. तिने ‘चक दे इंडिया’, ‘फोक्स’, ‘मिले ना मिले हम’ यांसारख्या हिंदी तर ‘प्रेमाची गोष्ट’ या मराठी चित्रपटात काम केलंय. ‘चक दे इंडिया’मध्ये हॉकीपटूची भूमिका साकारणारी सागरिका ही राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहे. ती ‘फिअर फॅक्टर’, ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील दिसली होती.