करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्री साई पल्लवीचा (Sai Pallavi) मुरुमाने भरलेला चेहरा पाहून ही अभिनेत्री म्हणून शोभते का, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. मात्र टीकाकारांचे सर्व अंदाज फोल ठरवत साई ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. गोरा रंग, देखणं रुप, नितळ त्वचा अशा सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांना साईने छेद दिला. चेहऱ्यावर मुरूम असतानाही तिने मेकअपनं ते लपवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यालाच तिने नैसर्गिक सौंदर्य मानत फेअरनेस क्रिमच्या कोट्यवधींच्या जाहिरातींना धुडकावलं. सध्या ती टॉलिवूडची (Tollywood) आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Birthday Special)
साईचं पूर्ण नाव साई पल्लवी सेंतमराइ आहे. वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेल्या साईने 2015 मध्ये ‘प्रेमम’ या चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने साकारलेली मलारची भूमिका खूप गाजली. त्यानंतर 2017 मध्ये वरुण तेजासोबत तिचा ‘फिदा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मिडल क्लास अब्बाइ, मारी 2, पडी पडी लेचे मनसू, एनजीके अशा एकाहून एक दमदार चित्रपटांत तिने काम केलं. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिने 2008 मध्ये एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या डान्स शोची ती विजेती ठरली होती.
अभिनयासोबत दमदार नृत्यकौशल्य अंगी असणारी साई तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ‘श्याम सिंघा रॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने पत्रकाराला फटकारलं होतं. सहकलाकार नानी आणि क्रिती शेट्टी यांना संकोच वाटेल असा प्रश्न पत्रकाराने विचारल्याचं तिने म्हटलं होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमधील किसिंग सीनवरून पत्रकाराने प्रश्न विचारला होता. “किसिंग सीनसाठी कोण कम्फर्टेबल होतं आणि कोण नव्हतं”, असा प्रश्न विचारला असता साईने पत्रकाराला मधेच थांबवलं. “माझ्या मते हा प्रश्नच खूप अनकम्फर्टेबल आहे. एकमेकांशी मोकळेपणे बोलल्यानंतर, सीनविषयी चर्चा केल्यानंतर त्यांनी कथेची गरज म्हणून तो सीन केला. आता जर त्यावरून तुम्ही प्रश्न विचारलात तर ते नक्कीच अनकम्फर्टेबल वाटणार”, असं ती म्हणाली. पत्रकाराने चित्रपटातील रोमँटिक सीन्सबद्दल पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हा साई पुन्हा मधेच थांबवत म्हणाली, “तुम्ही एकच प्रश्न विविध प्रकारे विचारत आहात आणि ते खूप चुकीचं आहे.” साईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं.