मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईची पुरती दैना केली. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे कोलमडली तर शहरातील अनेक भाग जलमय झाले. मुंबई आणि उपनगरांत मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. भरतीमुळे पाण्याचा निचरा झाला नाही. परिणामी दिवस उजाडण्यापूर्वीच शहराचं दळणवळण पुरतं कोलमडलं होतं. काही रस्ते बंद करण्याची वेळ आली. मध्य रेल्वेच्या अनेक लोकल गाड्या खोळंबल्याने नोकरदार वर्गाचे अतोनात हाल झाले. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सई ताम्हणकरची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट लिहिली आहे.
ढग आणि पावसाचा इमोजी पोस्ट करत तिने लिहिलं, ‘आज मुकाट्यानं घरी बसा..’ यासोबतच तिने #takecaremumbai हा हॅशटॅग जोडला आहे. सईने तिच्या या पोस्टद्वारे मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आज (मंगळवार) ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
सईने ही पोस्ट लिहिल्यानंतर काही तासांनी ती इन्स्टाग्राम स्टोरीवरून डिलिट केली. मात्र त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हवामान खात्याने आज मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भरतीचा इशाराही दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, अलिबाग आणि पनवेलमधील शाळा-महाविद्यालये आज बंद राहतील. तर मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक ही दहा ते पंधरा मिनिटं उशिराने आहे. रेल्वे प्रशासनाचं पितळ सोमवारच्या पावसाने उघडं पाडलं. शेकडो लोकल फेऱ्या, नऊ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर 50 हून अधिक रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक बदललं. यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभारावर तीव्र संताप आहे.