बॉलिवूड इंडस्ट्रीतील महान कलाकार राज कपूर यांचा जनशताब्दी सोहळा नुकताच कपूर कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र आलं होतं. 13 ते 15 डिसेंबरदरम्यान राज कपूर फिल्म फेस्टिव्हलचंही आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि रणबीर कपूर या दोघांमध्ये काहीतरी बाचाबाची झाल्याचं पहायला मिळतंय. रेड कार्पेटवर संपूर्ण कपूर कुटुंबीय फोटोसाठी एकत्र पोझ देत होते, त्याचवेळी सैफ आणि रणबीर यांच्यात काही वाद झाल्याची चर्चा आहे.
रणबीर जेव्हा सैफला स्क्रिनिंगच्या दिशेने जाण्याबद्दल काही सांगत असतो, तेव्हा सैफच्या चेहऱ्यावरील चिडचिड आणि राग स्पष्ट दिसून येते. यावेळी सैफ रणबीरला रागातच ‘ओके’ असं म्हणतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सैफ हा खरा जेंटलमन आहे. मी त्याला वैयक्तिक भेटले होते आणि त्याच्याशी कोणीच अशा वाईट पद्धतीने बोलत नाही. रणबीरची इतकी हिंमत कशी झाली’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘प्रत्येक कुटुंबात भांडणं होतातच’, असं दुसऱ्याने म्हटलंय. याच व्हिडीओमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरही तणावाचे भाव पाहून नेटकऱ्यांनी त्यावरही कमेंट्स केल्या आहेत.
कपूर कुटुंबीयांच्या या खास कार्यक्रमात सैफ त्याची पत्नी करीना कपूरसोबत पोहोचला होता. याशिवाय कार्यक्रमाला आलिया भट्ट, रणधीर कपूर, बबिता, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर सहानी, करिश्मा कपूर यांचीही उपस्थिती होती. बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महेश भट्ट, रेखा, कार्तिक आर्यन, शर्वरी वाघ, संजय लीला भन्साळी, फरहान अख्तर, पद्मिनी कोल्हापुरे, विकी कौशल, बोनी कपूर, सोनी राजदान, बॉबी देओल, शाहीन भट्टसह इतरही अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी होती.
कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांच्या जनशताब्दी सोहळ्याचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही दिलं होतं. यावेळी करिश्मा, करीना, सैफ, रणबीर, आलिया, नीतू हे सर्वजण दिल्लीला मोदींच्या भेटीला गेले होते. यावेळी मोदींनी कपूर कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवला आणि त्यांना विविध प्रश्नसुद्धा विचारले. तर करीना कपूरने तिच्या दोन्ही मुलांसाठी मोदींचा ऑटोग्राफ मागितला.