अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या घरात चोरीच्या उद्देशाने एक अज्ञात व्यक्ती शिरला होता. सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याचक्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरच्या टीमकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. सैफवर रुग्णालयात उपचार सुरू असून तैमुर आणि जेह ही दोन्ही मुलं सुरक्षित असल्याचं करीनाच्या टीमने सांगितलं आहे.
‘गेल्या रात्री सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर कुटुंबीय ठीक आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती करतो. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असल्याने मीडिया किंवा चाहत्यांनी याप्रकरणी कोणतेच अंदाज वर्तवू नयेत. तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद’, अशी माहिती करीनाच्या टीमकडून देण्यात आली आहे.
चोराने सैफ अली खानवर सहा वेळा हल्ला केल्याचं समजतंय. यात सैफच्या मणक्याजवळही वार झाला. सैफवर लिलावती रुग्णालयात सर्जरी करण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय. दरम्यान हल्ल्याच्या वेळी करीना घरात होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. आदल्या रात्री तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये डिनर पार्टीचे फोटो पोस्ट केले होते. बहीण करिश्मा कपूर, मैत्रिणी सोनम आणि रिया कपूर यांच्यासोबत पार्टी करत असल्याचा हा फोटो होता.
सैफवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती, अशीही माहिती समोर येत आहे. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून तो बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.