मुंबई : अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता एका जुन्या प्रकरणामुळे अभिनेत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ११ वर्षांपूर्वी मुंबई येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये एका उद्योजकासोबत झालेल्या वादामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. उद्योजकासोबत वाद आणि साक्षीदाराला दुखापत केल्याबद्दल न्यायालयाने अभिनेत्यावर अतिरिक्त आरोप निश्चित केले आहेत. सैफ अली खानवरील हा खटला पार्ट मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात चालवला जाणार आहे. सध्या सर्वत्र सैफ अली खान ज्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला ते प्रकरण चर्चेत आलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदारांना समन्सही बजावले आहेत. या प्रकरणाची सुनावणी 15 जून रोजी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संबंधीत प्रकरणी २०१७ मध्ये अभिनेत्याने न्यायालयात याचिका दाखल केली आणि अतिरिक्त आरोप निश्चित करण्याच्या विरोधात सत्र न्यायालयात धाव घेतली. पण २०१९ मध्ये न्यायालयाने अभिनेत्याची याचिका फेटाळली आहे.
या प्रकरणी फक्त सैफ अली खान याच्यासोबत अभिनेत्याच्या मित्रांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. न्यायालयाने सैफ अली खान आणि त्याचे दोन मित्र शकील आणि बिलाल यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५ आणि ३४ अंतर्गत अतिरिक्त आरोप निश्चित केले आहेत. उद्योजकासोबत झालेल्या वादामुळे अभिनेता मोठ्या अडचणीत अडकला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सैफ अली खान आणि त्याच्या मित्रांवर मजिस्ट्रेट न्यायालयाने कलम २३२ अंतर्गत खटला सुरु करण्यात आला होता. सांगायचं झालं तर, 22 फेब्रुवारी 2012 मध्ये सैफ अली खान त्याच्या मित्रांसोबत पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवत असताना, अभिनेत्याचे उद्योजकासोबत भांडण झालं. २०१२ मधील हे प्रकरण अद्यापही शमलेलं नाहीय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; दक्षिण आफ्रिकेतील व्यावसायिक इक्बाल शर्मा यांनी सैफ अली खान आणि त्याच्या मित्रांना मोठ्याने बोलण्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सैफ याने इक्बाल आणि त्यांचे सासरे रमणभाई यांना धमकी दिली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्याने इक्बालला धक्काबुक्की देखील केली, त्यामुळे त्याच्या नाकाला दुखापत झाली. आता या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…