मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटात अभिनेता सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सैफची गैरहजेरी असेल असं म्हटलं जातंय. या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यापासून तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यावरून बरेच वादसुद्धा निर्माण झाले. या वादामुळे निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख सहा महिने पुढे ढकलावी लागली. अखेर जून महिन्यात ‘आदिपुरुष’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधी होणाऱ्या प्रमोशनमध्ये सैफ कुठेच दिसणार नसल्याचं कळतंय.
सैफच्या गैरहजेरीमागचं कारण म्हणजे तो पत्नी करीना कपूर आणि दोन मुलं तैमुर, जेहसोबत वार्षिक सहलीला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दरवर्षी सैफ त्याच्या कुटुंबीयांसोबत फिरायला जातो. यामुळेच तो चित्रपटाच्या प्रमोशनला हजर राहणार नसल्याचं समजतंय. रिपोर्ट्सनुसार ‘आदिपुरुष’चं प्रमोशन हे संपूर्णपणे प्रभासवर केंद्रीत असेल. या चित्रपटात प्रभास हा रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सनॉन सीतेच्या भूमिकेत आहे.
या बिग बजेट चित्रपटातील व्हीएफएक्सवर प्रेक्षकांनी जोरदार टीका केली होती. या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला होता. देशभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आणि चित्रपटात अपेक्षित बदल करण्याचा निर्णय घेतला. ‘आदिपुरुष’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. त्याच्याही लूकवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद नंतर इतका वाढला की निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली.
हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. टीझरमधील VFX वरून नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने व्हिएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येत्या 16 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाला.