वयाच्या 36 व्या वर्षी सैफला आला होता हृदयविकाराचा झटका; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

| Updated on: Jan 16, 2025 | 9:31 AM

अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने चाकूहल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी 2007 मध्ये सैफला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तो 36 वर्षांचा होता.

वयाच्या 36 व्या वर्षी सैफला आला होता हृदयविकाराचा झटका; त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?
Saif Ali Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरून एका चोराने त्याच्यावर चाकूहल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोराने हल्ला केला तेव्हा सैफसह त्याच्या घरातील इतर सदस्य गाढ झोपेत होते. हल्ल्यानंतर जेव्हा कुटुंबीय जागे झाले, तेव्हा चोराने तिथून पळ काढला. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. सध्या सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. सैफला याआधी हृदयविकाराच सौम्य झटकाही आला होता. त्यावेळी तो 36 वर्षांचा होता. 2007 मध्ये छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

2007 मध्ये सैफ दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतल्यानंतर स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी सराव करत होता. तेव्हा अचानक संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याला छातीत दुखू लागलं होतं. त्याचदिवशी सैफला त्याच्या ‘ओमकारा’ या चित्रपटातील खलनायकी भूमिकेसाठी पुरस्कार मिळणार होता. या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहायला जात असतानाच त्याला त्रास जाणवू लागला होता. याविषयी सैफची बहीण सोहा म्हणाली होती, “तो नॉनस्टॉप काम करतोय. तो रात्री दीड वाजता दक्षिण आफ्रिकेतून आला आणि तिथून थेट पुरस्कार सोहळ्यातील डान्सच्या सरावासाठी गेला.”

हे सुद्धा वाचा

सैफला रुग्णालयात दाखल केल्याची बातमी कळताच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याची भेट घेतली. पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणारे अमिताभ बच्चन, संजय दत्त यांना सैफबद्दल समजताच ते तातडीने रुग्णालयात गेले. याशिवाय फरदीन खान, प्रिती झिंटा, कुणाल कोहली, जॅकी श्रॉफ यांसारख्या सेलिब्रिटींनीही त्याची भेट घेतली होती.

दरम्यान चाकूहल्ला झाल्यानंतर सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.