‘सैराट’नंतर गाजलेली रिंकू राजगुरूची मुलाखत; ऑडिशनपूर्वी कसं होतं आयुष्य?

| Updated on: Feb 27, 2024 | 12:18 PM

'सैराट' या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारत अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरात पोहोचली. या चित्रपटानंतर रिंकूच्या प्रसिद्धीत प्रचंड वाढ झाली. त्यावेळी रिंकूने दिलेली एक मुलाखत चर्चेत आली आहे. ऑडिशन देण्यापूर्वी तिचं आयुष्य कसं होतं आणि नंतर कसं बदललं, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

सैराटनंतर गाजलेली रिंकू राजगुरूची मुलाखत; ऑडिशनपूर्वी कसं होतं आयुष्य?
Rinku Rajguru
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 27 फेब्रुवारी 2024 | नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्य पूर्णपणे पालटलं. रिंकू 15 वर्षांची असताना या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 17 वर्षांची असताना रिंकूला तिच्या वाढत्या प्रसिद्धीपेक्षा अधिक चिंता परीक्षेच्या निकालाची होती. रिंकूचा हाच साधेपणा अनेकांना आजही भावतो. ‘सैराट’ प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या बऱ्याच मुलाखती झाल्या. मात्र एका मुलाखतीत रिंकू विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली होती.

पुढील पाच वर्षांत तू स्वत:ला कुठे पाहतेस असा प्रश्न विचारल्यावर रिंकू म्हणाली, “मला चांगलं काम करायचंय पण त्याआधी मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. सध्या मी माझ्या निकालाची प्रतीक्षा करतेय. मी चांगला अभ्यास केलाय, त्यामुळे मनात भीती नाही. सैराटच्या आधी मला कोणीच ओळखत नव्हतं. माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अभ्यास होता. आता अचानक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रत्येक कानाकोपऱ्यातील व्यक्ती मला ओळखू लागली आहे. जे लोक मराठी बोलत नाहीत किंवा समजत नाही, तेसुद्धा मला ओळखू लागले आहेत. मला इतकं प्रेम मिळेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.”

हे सुद्धा वाचा

अकलूजची रिंकू ‘सैराट’च्या शूटिंगच्या वेळी फक्त 15 वर्षांची होती. “रातोरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझ्या मनात भीती निर्माण झाली नाही. पण मला या यशाची किंचितही कल्पना नव्हती. या संधीसाठी मी आयुष्यभर आभारी आहे. मला हे यश सांभाळून ठेवायचं आहे आणि त्याबाबत जबाबदार व्हायचंय. या यशामुळे मी घाबरले नाही. माझ्या स्वभावात जराही बदल झालेला नाही. मी अजूनही तशीच आहे. कारण मी स्टारडमबद्दल विचार करत नाही. लोक जेव्हा मला मोठी स्टार म्हणून वागणूक देतात, तेव्हा मला संकोचलेपणा वाटतो. मी अजूनही लहानच आहे, मला तशीच वागणूक द्या”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली होती.

‘सैराट’नंतर येणाऱ्या ऑफर्सविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “सैराटनंतर मला बरेच ऑफर्स आले होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असं मला अनेकांनी सांगितलं होतं. पण मला असं वाटलं की सैराटनंतरचा माझा पुढचा चित्रपटसुद्धा तितकाच चांगला असावा. कोणीच सैराट पुन्हा बनवू शकत नाही, पण आपण नक्कीच काहीतरी पॉवरफुल बनवू शकतो आणि त्यासाठीच मी चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता.”