बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या दोन्ही पत्नींविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. सलमा खान आणि हेलन या दोघींचं त्यांनी कौतुक केलंय. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी नशीबवान आहे की मला दोन पत्नी आहेत आणि त्या दोघी एकमेकींसोबत आनंदाने राहतात. काही वर्षांनंतर हे सर्व शक्य झालं. तरी काही हरकत नाही. माझ्या बायका दिसायला सुंदर आहेत आणि आता त्या सुंदरपणे वृद्धापकाळाकडे वळत आहेत.” सलीम खान यांनी 1964 मध्ये सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर सलमा यांच्याशी विवाहित असतानाही त्यांनी 1981 मध्ये अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं.
याआधी ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले होते. “अर्थातच जेव्हा मी सलमाला हेलनविषयी सांगितलं, तेव्हा तिने मला शाबासकी दिली नाही किंवा मी जे केलंय त्याबद्दल काही चांगले शब्द बोलली नाही. आमच्याही संसारात काही समस्या आल्या होत्या. पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. ठराविक काळानंतर सर्वकाही ठीक झालं होतं. सर्वांनी एकमेकांचा स्वीकार केला होता. मी माझ्या मुलांनाही हेलनविषयी सांगितलं होतं. पण त्याचसोबत त्यांना असंही स्पष्ट केलं होतं की, मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीत. तुम्ही तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, तुमच्या आईइतकंच तुमची तिच्यावर माया असायला हवी, अशा माझ्या अपेक्षा नाहीत. पण किमान तुम्ही तिला तितकाच आदर द्यावा असं मला वाटतं, हे मी मुलांना सांगितलं होतं.”
हेलन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सलीम खान हे मुलगी अरबाजच्या शोमध्येही व्यक्त झाले होते. “त्यावेळी ती तरुण होती, मीसुद्धा तरूण होतो. माझा काही चुकीचा उद्देश नव्हता. मी तिच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक प्रसंग होता, जे कोणासोबतही घडलं असतं,” असं ते म्हणाले होते. 1980 मध्ये सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम आणि हेलन यांनी लग्न केल्यानंतर अर्पिताला दत्तक घेतलं. तर पहिल्या लग्नापासून सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही सलीम आणि सलमा यांची मुलं आहेत.