मुंबई : आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेचा परिणाम रविवारी रात्री मुंबईचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये दिसून आला. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पार्ट्रीमध्ये अभिनेता सलमान खान देखील उपस्थित होता. पण कडेकोट बंदोबस्तात सलमान खान या पार्टीत पोहोचला. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर कडेकोट बंदोबस्तात सलमान खान या पार्टीत पोहोचल्याची चर्चा रंगत आहे.
काही दिवसांपासून सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, अहमद याच्या हत्येनंतर सलमान खान याच्या सुरक्षेबाबत अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. मीडिया आणि पाहुण्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर सलमान इफ्तार पार्टीमध्ये दाखल झाला.
माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचं आयोजन रविवारी सायंकाळी मुंबईतील ताज लँड अन्ड हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. पार्टीमध्ये सलमान जवळपास रात्री आठच्या सुमारास पोहोचला. सलमान येणार म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सलमानच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस देखील सतर्क आहेत.
पार्टीमध्ये सलमान खान आठ वाजता पोहोचला आणि अर्ध्या तासात तेथून निघाला. पार्टीमध्ये अभिनेता शाहरुख खान, संजय दत्त यांच्या शिवाय इमरान हाशमी, सुभाष घई, रितेश देशमुख, जिनिलिया डिसूजा, प्रिती झिंटा, पूजा हेगडे, सलीम खान, आयुष शर्मा, सुनील शेट्टी, अर्पिता खान, नेहा शर्मा आणि कपिल शर्मा देखील उपस्थित होते. सध्या सर्वत्र बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा सुरु आहे.
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार; शनिवारी रात्री १० वाजता पोलिसांचं पथक अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. दरम्यान, पत्रकार म्हणून पोचलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अतिक आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत.