मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरी मंगळवारी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं. मंगळवारी संध्याकाळी अंबानींच्या ‘अँटिलिया’ घरात गणेश पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेला बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारण क्षेत्रातील बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र या सेलिब्रिटींमध्ये अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चनने सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी सलमान निळ्या रंगाच्या कुर्त्यांमध्ये दिसला. तर दुसरीकडे ऐश्वर्यानेही निळ्याच रंगाचा ड्रेस घातला होता. गणपतीच्या दर्शनाला जाण्याआधी त्यांनी बाहेर पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. अर्थातच हे दोघं एकत्र नव्हते.
सलमानने भाची अलीजेहसोबत एण्ट्री केली. निळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा असा त्याचा लूक होता. यावेळी पापाराझींसमोर त्याने भाचीसोबत फोटोसाठी पोझ दिले. तर दुसरीकडे ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. ऐश्वर्याने निळ्या रंगाचा पटियाला कुर्ता सूट परिधान केला होता. तर आराध्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत होती. दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझ दिले.
बॉलिवूडमध्ये अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा काही नवीन नाहीत. आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या चर्चा चवीने चघळल्या गेल्या आहेत. ब्रेकअप करताना यापैकी काहींनी एकमेकांना समजून घेत परस्पर संमतीने मार्ग वेगळे केले. तर काही जोडप्यांचं अफेअर आणि ब्रेकअप या दोन्ही गोष्टींच्या चर्चा कितीही वर्षे झाली तरी पुन्हा नव्याने होऊ लागतात. सलमान खान आणि ऐश्वर्या रायची जोडी अशीच आहे. या दोघांचं प्रेमप्रकरण जितकं जगजाहीर होतं, तितकंच त्याचं ब्रेकअपसुद्धा. नात्यात कटुता आल्यानंतर हे दोघं पुन्हा कधीच एकमेकांसमोर आले नाहीत. मात्र या दोघांना कधीही एकत्र पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी मोठा सरप्राईजच असतो.
अंबानींच्या घरातील गणपतीच्या दर्शनासाठी शाहरुख खान, गौरी खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, रितेश देशमुख, रेखा, आलिया भट्ट, जिनिलिया देशमुख, शाहिद कपूर, अनन्या पांडे यांसारखे सेलिब्रिटी पोहोचले होते.