‘ही बिश्नोईची भीती’; सलमान खानची तगडी सुरक्षाव्यवस्था पाहून नेटकऱ्यांचे कमेंट्स

| Updated on: Nov 23, 2023 | 9:11 AM

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एअरपोर्टवरून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी त्याच्या अवतीभवती सुरक्षारक्षकांचा घोळका पहायला मिळतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

ही बिश्नोईची भीती; सलमान खानची तगडी सुरक्षाव्यवस्था पाहून नेटकऱ्यांचे कमेंट्स
Salman Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 23 नोव्हेंबर 2023 | सेलिब्रिटी आणि त्यांच्या भोवती असलेली तगडी सुरक्षा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. नुकताच अभिनेता सलमान खानचा मुंबई विमानतळाबाहेरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानच्या अवतीभवती प्रचंड सुरक्षा पहायला मिळतेय. सलमान 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तिथून परतत असतानाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये सलमानचा बॉडीगार्ड एका चाहत्याला धक्का देतानाही दिसत आहे. एक चाहता सलमानकडे फुलांचा गुच्छ घेऊन जात असतो, तितक्यात बॉडीगार्ड त्याला धक्का देऊन बाजूला करतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई विमानतळाबाहेर सलमानसोबत तगडी सुरक्षाव्यवस्था होती. त्याला खासगी बॉडीगार्ड शेरासोबतच इतर बॉडीगार्ड्सची टीम आणि त्यासोबतच वाय प्लस सेक्युरिटी सलमानसोबत होती. या सुरक्षारक्षकांच्या हातात शस्त्रे होती. एअरपोर्टच्या गेटमधून सलमान बाहेर पडताच बॉडीगार्ड्स त्याच्यासाठी वाट मोकळी करत होते. अशातच एक चाहता त्याच्या हातात फुलांचा गुच्छ घेऊन सलमानच्या दिशेने जाऊ लागतो. सलमानच्या जवळ जाण्याआधीच बॉडीगार्ड्स त्याला धक्का देऊन बाजूला करतात.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेख केला आहे. लॉरेन्सने सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरच त्याची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. सलमानला सध्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविली जाते. ‘ही लॉरेन्स बिश्नोईची भीती आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘बिश्नोईच्या धमकीचा परिणाम’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.

पहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला तुरुंगातून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने दिला. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे.