अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली आहे. खान कुटुंबीयांशिवाय सलमानचे चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकजण या घटनेनं चिंतेत आहेत. गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी त्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाबा सिद्दिकी यांसह इतरही काही जणांनी ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये जाऊन सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सध्या तिथलं वातावरण अत्यंत गंभीर असून पोलीस आणि मीडियाची तिथे सतत ये-जा सुरू आहे. यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. अशातच सलमानच्या कुटुंबीयांनी सेलिब्रिटी आणि इतरांना खास विनंती केली आहे.
गोळीबाराच्या घटनेचा सलमानला त्याच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यामुळे तो रविवारी पहाटे गोळीबार झाल्यानंतरही सोमवारी तो कामानिमित्त घराबाहेर पडला आणि रात्री उशिरा घरी परतला. सलमानने त्याच्या शूटिंगमध्ये कोणताच अडथळा येऊ दिला नाही. इतरांच्या कामातही व्यत्यत येऊ नये म्हणून तो ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्याचं काम पूर्ण करतोय. सलमानच्या कुटुंबीयांनीही हल्लेखोरांकडे अधिक लक्ष न देण्याचं ठरवलं आहे. मात्र ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर कडक सुरक्षा असल्याने आणि इतरांना काही त्रास होऊ नये म्हणून सेलिब्रिटींनी त्यांनी घरी भेटण्यासाठी न येण्याचं आवाहन केलं आहे.
सलमानचे वडील सलीम खान यांनी ‘न्यूज 18’ला दिलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, “सांगण्यासारखं काहीच नाही. त्यांना फक्त प्रचार करायचा आहे. चिंतेचं काहीच कारण नाही.” सलमानच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे गोळीबार झाला. यात कोणीही जखमी झाले नाही. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. याप्रकरणी वांद्रे पोलीस तसंच स्थानिक पोलीस गुन्हे शाखा समांतर तपास करत आहेत. गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल याने फेसबुक पोस्टद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान घरीच होता. गोळीबार झाला त्यापूर्वी दोन तास म्हणजे तीनच्या सुमारास सलमान घरी आला होता. सलमानच्या घराबाहेर सुरक्षेसाठी पोलिसांसह पोलिसांची एक गाडी असते. पण गोळीबार झाला तेव्हा ती गाडी तिथे होती की नव्हती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.