अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणातील आरोपी अनुज थापन याने बुधवारी कोठडीत आत्महत्या केली. 32 वर्षीय अनुजने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येणार आहे. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र कोठडीत नेमकं काय झालं होतं, त्याबद्दलची माहिती समोर आली आहे. थापनला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्यात एकूण दहा आरोपी होते. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील इतर दोन आरोपींना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी नेलं होतं. त्यावेळी थापन इतर आरोपींसह कोठडीतच होता.
दुपारी 12 च्या सुमारास आरोपींना देण्यात येणाऱ्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 1 वाजताच्या सुमारास इतर एका आरोपीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आरडाओरडा करून पोलिसांना बोलावलं. त्यानंतर थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आझाद मैदान पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली आणि त्यानंतर थापनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे रुग्णालयात पाठविला.
कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर त्रयस्थ पोलीस विभागामार्फत चौकशी करण्यात येते. थापनने गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केल्यामुळे आता याप्रकरणी सीआयडीमार्फत तपास करण्यात येणार आहे. आत्महत्या केलेला थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता. तो बिष्णोई गँगशी संबंधित होता. त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुलं आणि 40 जिवंत काडतुसं पुरविल्याचा त्याच्यावर आरोप होता. हत्यारे देण्यासाठी तो 15 मार्चला पनवेलला आला होता. गोळीबार करणारे आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना पिस्तुल देण्यापूर्वी चंदर आणि थापन यांनी दोन गोळ्या झाडल्याचाही संशय आहे.