अभिनेता सलमान खानला मंगळवारी पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली. मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज मिळाला. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. हे पैसे नाही मिळाले तर सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात 354 (2) आणि 308 (4) कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशाच पद्धतीचा धमकीचा मेसेज ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मिळाला होता. त्यातही सलमान खानकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर हा धमकीचा मेसेज मिळाला होता.
सलमानला गेल्या काही महिन्यांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे. सलमानच्या अत्यंत जवळचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानची सुरक्षा वाढवली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा इथल्या एका 20 वर्षीय तरुणाने सलमान खान आणि राष्ट्रवादीचे नेते झीशान सिद्दिकी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. “आरोपीने सुरुवातीला आमदार झीशान सिद्दिकीच्या हेल्पलाइन नंबरवर धमकीचा मेसेज पाठवला होता आणि नंतर त्यावर व्हॉईस कॉल केला. या कॉलद्वारेही सिद्दिकी आणि सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी घडली”, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला नोएडा इथून अटक करण्यात आली. वांद्रे पूर्व इथल्या झीशान सिद्दिकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात कॉल करण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलंय.
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी आणि सलमान यांचं अत्यंत जवळचं नातं होतं. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली होती. जो सलमान खान आणि दाऊद यांची मदत करेल, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा, अशी धमकीच बिष्णोई गँगकडून फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे सलमानशी जवळीक असल्यानेच सिद्दिकी यांना आपले प्राण गमवावे लागल्याचं म्हटलं जातंय.