मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव रॉकी भाई असं सांगितलं. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्या रॉकी भाईने पोलीस कंट्रोलला सांगितलं की तो जोधपूरचा राहणारा आहे आणि तो एक गोरक्षक आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा फोन आला होता.
याआधी बिश्नोई गँगचा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. जेव्हा मी सलमान खानला मारेन तेव्हाच खरा गुंड म्हणवून घेईन, अशी धमकीच बिश्नोईने दिली होती. तुरुंगात हातापायात बेड्या घालून शिक्षा भोगत असलेल्या बिश्नोईने थेट धमकी दिल्याने पोलिसांचीही झोप उडाली होती.
लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगातून एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान त्याने सलमान खानला ठोस उत्तर देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. “आमच्या समाजाने जर त्याला माफ केलं नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने कारवाई करू. आम्ही कोर्ट किंवा इतर कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहणार नाही”, असा इशारा त्याने दिला होता.
सलमानने त्यांच्या मंदिरात जाऊन त्यांची माफी मागावी, अशीही मागणी बिश्नोईने केली होती. “बिकानेरच्या पुढे नौखा तहसीलमध्ये आमचं मंदिर आहे. तिथे येऊन त्याने माफी मागावी. जर त्याने माफी मागितली नाही तर आम्ही त्याचा अहंकार मोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी नाही तर विनंती आहे. सलमानला माझ्या गँगकडून कोणताच धोका नाही. माझी इतकीच मागणी आहे की त्याने आमच्या समाजाला संतुष्ट करावं”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
सलमानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. म्हणूनच खबरदारीसाठी त्याने नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान स्वतःचा बचाव करू शकेल. सलमानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. सध्या ही कार भारतीय बाजारपेठेत लाँचदेखील झाली नाहीये. पण वारंवार येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानने ही कार खरेदी केली आहे.