मुंबई : 9 मार्च 2024 | “तुझा फोन बंद कर, मी म्हटलं ना की फोन बंद कर.. डिलीट कर ते..” हे शब्द सलमान खानच्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये ऐकायला मिळत आहेत. एक चाहता बाजूने चालत असताना सलमानचा लपून व्हिडीओ शूट करत होता. जेव्हा सलमानचं लक्ष त्याच्याकडे गेलं, तेव्हा तो भडकला आणि त्याने चाहत्याला फोन बंद करण्यास सांगितलं. सलमानने त्या चाहत्याला व्हिडीओ डिलीट करण्यासंही म्हटलं होतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की तो चाहता सलमानच्या थोडं पुढे चालतोय. त्याच्या फोनमध्ये तो सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड करत असतो. जेव्हा सलमानची नजर त्याच्यावर पडते, तेव्हा तो भडकतो. सलमान बोटाने इशारा करत त्याला फोन बंद करण्यासाठी सांगतो. शूट केलेला व्हिडीओसुद्धा डिलीट करण्याचा इशारा देतो. हे ऐकून व्हिडीओ शूट करणारा चाहता त्याची माफी मागतो. ‘सॉरी सर, सॉरी सर’ म्हणत तो फोन बंद करतो. मात्र नंतर तोच चाहता सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करतो. या व्हिडीओत हेसुद्धा पहायला मिळतंय की एअरपोर्ट कर्मचारी त्या चाहत्याला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यापासून रोखतात. मात्र तो त्यांच्याकडेही दुर्लक्ष करतो. सलमान हे सर्व पाहत असतो आणि अखेर तो चाहता ऐकण्यास तयार नसल्याने तो त्याच्यावर भडकतो.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सलमानने व्हिडीओ डिलीट करायला सांगितलं तरी तू इथे पोस्ट का केलास, असा सवाल काहींनी त्या चाहत्याला विचारला आहे. तर बॉलिवूड कलाकारांना अशा पद्धतीने फॉलो करू नका, असंही एका युजरने म्हटलंय. त्यांच्या खासगी आयुष्याचा थोडा तरी सन्मान करा, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.
सलमान खान नुकताच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनला उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने स्टेजवर शाहरुख खान आणि आमिर खानसोबत डान्ससुद्धा केला होता. सलमानच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता तो विष्णुवर्धनच्या नव्या चित्रपटात झळकणार आहे.