अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या पोलीस कोठडीतील कथित आत्महत्येविरोधात त्याच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनुजची आत्महत्या संशयास्पद असल्याचा दावा करून त्याच्या आईने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पंजाबमधील सुखचैन गावात वास्तव्यास असलेली अनुजची आई रिता देवी यांनी राज्य सरकार आणि मुंबई गुन्हे शाखेसोबतच अभिनेता सलमान खान यालाही या याचिकेत प्रतिवादी केलं आहे. अनुजने पोलीस कोठडीत आत्महत्या केलेली नाही, तर पोलीस कोठडीत केलेल्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी याचिकेत केला आहे. तसंच अनुज याच्या मृतदेहाचं नव्याने शवविच्छेदन करण्याची आणि या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशीचीही मागणी केली आहे.
सलमानच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरू केली. त्याचाच भाग म्हणून विशेष मोक्का न्यायालयाने 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुजच्या अटकेनंतर तो ‘ही लोकं मला मारून टाकतील, मला वाचवा’ असं फोनवर ओरडताना ऐकल्याचा आणि त्यानंतर फोन बंद झाल्याचा दावाही त्याच्या आईने याचिकेत केला आहे. गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या सीसीटीव्हीतील फुटेज आणि 24 एप्रिल ते 2 मे या कालावधीतील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सलमानसह त्याच्या सहकाऱ्यांची फोन संभाषण माहिती जतन करून ठेवण्याची मागणी अनुजच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अनुज थापनला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्यात एकूण दहा आरोपी होते. सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील इतर दोन आरोपींना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी नेलं होतं. त्यावेळी थापन इतर आरोपींसह कोठडीतच होता. दुपारी 12 च्या सुमारास आरोपींना देण्यात येणाऱ्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तिथेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, असं कळतंय. दुपारी 1 वाजताच्या सुमारास इतर एका आरोपीने हा प्रकार पाहिला आणि त्याने आरडाओरडा करून पोलिसांना बोलावलं. त्यानंतर थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
आत्महत्या केलेला थापन हा ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता. तो बिष्णोई गँगशी संबंधित होता. त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुलं आणि 40 जिवंत काडतुसं पुरविल्याचा त्याच्यावर आरोप होता.