अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तपासात मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचला गोळीबारात वापरलेली एक पिस्तूल सोमवारी सूरतमधील तापी नदीत सापडली होती. त्यानंतर आता नदीत फेकलेलं दुसरं पिस्तूलही पोलिसांना सापडलं आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही शोधमोहीम सुरू होती. यासोबतच पोलिसांना जिवंत काडतुसं मिळाली आहेत. दोन्ही शूटर्सने पोलिसांना सांगितलं होतं की त्यांच्याकडे एक नाही तर दोन पिस्तूल होत्या. सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांना पोलिसांनी गोळीबार प्रकरणी अटक केली होती. चौकशीदरम्यान या दोघांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर शूटर्सनी सूरज पोहोचून दोन्ही पिस्तूल तापी नदीत फेकल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यांना सलमानच्या घराबाहेर एक-दोन नाही तर दहा राऊंड फायरिंग करण्याचा आदेश मिळाल्याचाही खुलासा त्यांनी चौकशीदरम्यान केला. दोन्ही शूटर्सना गोळीबार करायचे आदेश होते. मात्र पकडले जाण्याच्या भीतीमुळे फक्त एकानेच गोळीबार केला होता. याप्रकरणी आतापर्यंत दहा जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत.
गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. सागर पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर दोघांनी पळ काढत गुजरात गाठलं होतं. या ठिकाणी येताच गुजरातमधील नदीत त्यांनी पिस्तूल फेकून दिले होते.
सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोईकडून आरोपींना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते. त्यापैकी आधी मिळालेल्या एक लाख रुपयांत आरोपींनी जुनी बाईक विकत घेतली. यासाठी त्यांनी 24 हजार रुपये खर्च केले. तर पनवेल याठिकाणी 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून जमा करून दर महिना 3500 हजार रुपये भाडेतत्त्वावर घर घेतलं. यासाठी त्यांनी ओळखपत्र म्हणून खरे आधारकार्ड दिले होते. जवळपास 11 महिन्यांचा करार त्यांनी केला होता.