मुंबई : अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमानने बऱ्याच नवीन कलाकारांना मोठ्या पडद्यावर संधी दिली आहे. एकीकडे बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तर दुसरीकडे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सलमानच्या या चित्रपटातून इंडस्ट्रीत पहिलं पाऊल टाकतेय. याशिवाय डान्सर राघव जुयाल, टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगम यांच्यासुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातील गाणी आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पलकने सलमानच्या चित्रपटाच्या सेटवरील एका खास नियमाबद्दलचा खुलासा केला आहे.
पलकने याआधीही सलमानसोबत काम केलं होतं. ‘अंतिम’ या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. याचा खुलासा खुद्द ‘भाईजान’ने ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात केला होता. आता पलकने चित्रपटाच्या सेटवरील एका खास नियमाबद्दल सांगितलं आहे. पलकच्या मते ‘अंतिम’ चित्रपटादरम्यान सलमान खानने त्याच्या सेटवर काम करणाऱ्या मुलींसाठी काही नियम आखले होते. या नियमांनुसार मुलींना सेटवर अंगभर कपडे घालणं बंधनकारक होतं.
सेटवर डीप नेकलाइनचे कपडे परिधान करण्यास मुलींना मनाई होती. पलकने तिच्या या मुलाखतीत सांगितलं की सलमानने सर्व मुलींना सेटवर अंगभर कपडे परिधान करून येण्यास सांगितलं होतं. सेटवर मुलींच्या सुरक्षेसाठी सलमानने विशेष काळजी घेतली होती, असंही पलकने सांगितलं.
सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. खुद्द सलमानने या चित्रपटासाठी मोठी फी आकारली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय.