Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्या जीवाला धोका आहे. गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी सलमानच्या घराबाहेर गोळीबार करत अभिनेत्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमकावण्यात आलं होतं. तर काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कनेक्शन देखील सलमान खानशी जोडण्यात आलं. शिवाय लॉरेन्स बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सलमानच्या जीवाला अधिक धोका निर्माण झाला. गंभीर परिस्थिती पाहाता सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर आता सलमान खान आहे. यामुळे भाईजानने स्वतःच्या सुरक्षेसाठी 2 कोटी रुपयांची बुलेट प्रुफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अभिनेत्याकडे आधीच लँड क्रूझर आणि निसान पेट्रोल होते. आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कार खरेदी केली आहे.
रिपोर्टनुसार, सलमान खानच्या नव्या बुलेट प्रूफ कारची किंमत 2 कोटी रुपये आहे. आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने नवी कार दुबईहून आयात केली आहे. सलमानचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि बाबा सिद्दिकीची सलमानसोबतची मैत्री हे कारण सांगितले.
धमकीसह बिश्नोई गँगने भांडण संपवण्यासाठी सलमान खान याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला 5 कोटी रुपये देण्याची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला जात आहे.
जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानचे नशीब माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल…. अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे. सध्या सलमान खानला धमकी मिळालेल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.