मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी धूमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खानला त्याचे जुने दिवस आठवले. बिग बॉसच्या यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धकांनी मिळून घराचं बाथरूम स्वच्छ ठेवल्याचं त्याने सांगितलं. हे सांगतानाच त्याला त्याचे तुरुंगातील दिवस आठवले. बिग बॉसच्या घरातील बाथरुम स्वच्छ ठेवल्याबद्दल सलमानने आधी स्पर्धकांचं कौतुक केलं. यासाठी त्याने विशेषकरून पूजा भट्टची प्रशंसा केली. तो म्हणाला, “मी बाथरुमसुद्धा स्वच्छ केले आहेत. मी बोर्डिंग स्कूलमध्ये राहायचो. मला माझी कामं स्वत:च करायची सवय आहे. जेलमध्येही मी सर्व कामं केली आहेत. कोणतंच काम छोटं किंवा मोठं असत नाही.”
बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आयुषमान खुराना आणि अनन्या पांडे यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी आयुषमानने सलमानला एक प्रश्न विचारला. “तुमच्या यशामागे किती महिलांचा हात आहे”, असं त्याने विचारलं. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “चार, दोन आई आणि दोन बहिणी.”
सलमानने 2008 मध्ये ‘ऑन द काऊच विथ कोएल’ या शोच्या एका एपिसोडमध्ये तुरुंगातील दिवस कसे होते, याविषयी सांगितलं होतं. “मी ब्लँक होतो. तुरुंगात मला सर्वाधिक त्रास बाथरुमचा आणि तिथे पडलेल्या कचऱ्याच्या डब्यांचा होता. पोलीस कस्टडीमधअये तिथे 9-10 रुम्स होते आणि प्रत्येक रुममध्ये 9-10 लोक होते. त्यांच्यासाठी एक बाथरुम, एक टॉयलेट”, असं तो म्हणाला होता.
बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन युट्यूबर एल्विश यादवने जिंकला. घरात एण्ट्री करताच एल्विशने आपली दमदार खेळी दाखवली. बिग बॉसच्या घराबाहेरही एल्विशला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल 13.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर हरयाणाचा एल्विश हा कोट्यवधींचा मालक आहे. अवघ्या 25 व्या वर्षी एल्विशने हे यश संपादन केलं आहे.
वाइल्ड कार्ड एण्ट्री घेणाऱ्या एल्विश यादवने त्याच्या हरयाणवी अंदाजाने लोकांच्या मनावर राज्य केलं. त्याने 2016 मध्ये युट्यूबर म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. 25 वर्षांचा एल्विश यादव हरयाणामधील गुरुग्राममध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच्या याच देसी अंदाजामुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. त्याला युट्यूबवर लाखो लोक फॉलो करतात. त्याचे एक नाही तर तीन वेगवेगळे युट्यूब चॅनल आहेत. या तिन्ही चॅनलचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत.