अभिनेता सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. याप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. 1998 मध्ये राजस्थानमधील एका गावात काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. त्यावेळी सलमान हा अभिनेता सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्यासोबत ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाची शूटिंग करत होता. या आरोपानंतर सलमान कायद्याच्या पेचात अडकला होता. तब्बल 26 वर्षे चाललेल्या या खटल्यात सलमानला अटक झाली, त्याची जामिनावर सुटका झाली, त्याला निर्दोष ठरवलं गेलं, पुन्हा दोषी ठरवलं गेलं आणि त्याला जामिनावर सोडलं गेलं. या खटल्यादरम्यान सलमानने त्याची बाजू मांडण्यासाठी काही मुलाखती दिल्या होत्या. त्यातील एका मुलाखतीत त्याने काळवीटांच्या कळपासमोर गेल्याचं कबुल केलं होतं.
2009 मध्ये त्याने ‘एनडीटीव्ही’ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सलमानने काळवीटला फक्त बिस्किट खाऊ घातल्याचं कबुल केलं होतं. शूटिंगदरम्यानचा किस्सा त्याने सांगितला होता. “मला असं वाटतं की इथूनच सगळ्याची सुरुवात झाली होती. एकेदिवशी पॅकअपनंतर आम्ही सर्वजण प्रवास करत होतो. माझ्यासोबत सैफ अली खान, तब्बू, नीलम कोठारी, अमृता, सोनाली हे सर्वजण होते. त्याचवेळी आम्हाला एक हरणाचं पाडस झुडुपात अडकल्याचं दिसलं होतं. तिथे हरणांचा पूर्ण कळपसुद्धा होता. मी कार थांबवली. ते पाडस खूपच घाबरलेलं होतं. आम्ही त्याला झुडुपातून बाहेर काढलं आणि त्याला पाणी पाजलं. तो खूपच घाबरलेला होता. थोड्या वेळानंतर त्याने मस्तपैकी बिस्किट वगैरे खाल्लं आणि नंतर तो तिथून निघून गेला. त्यादिवशी आमचं पॅकअप खूप लवकर झालं होतं. आम्ही सर्वजण सोबत होतो. मला असं वाटतं की या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात तिथूनच झाली असावी”, असं सलमान म्हणाला.
सलमानवर काळवीट शिकारीचा आरोप असून आजही त्याला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांनीसुद्धा त्याचा बचाव केला होता. सलमानने प्राण्याची शिकार केली नाही आणि शिकारीच्या वेळी तो तिथे उपस्थितही नव्हता, असं ते म्हणाले. “आणि तो मला खोटं सांगणार नाही. त्याला प्राण्याला मारण्याचा शौक नाही. प्राण्यांवर तो प्रेम करतो. माफी मागितल्याचा अर्थ असा होईल की त्याने चूक मान्य केली. सलमानने कधीच कोणत्या प्राण्याला मारलं नाही. आम्ही कधी कोणत्या झुरळालाही मारलं नाही. आम्ही अशा गोष्टींवर विश्वासच करत नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.