मुंबई : अभिनेता सलमान खानला गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. रात्रभर मुंबई पोलिसांचे जवान सलमानच्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर तैनात होते. सलमानच्या घराबाहेर ते गर्दीलाही जमू देत नाहीयेत. धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
18 मार्च रोजी सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलवारला धमकीचा एक ई-मेल मिळाला होता. या ई-मेलमध्ये सलमानशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. रोहित गर्ग या नावाने हा मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की ‘गोल्डी ब्रारला तुझा बॉस म्हणजेच सलमान खानशी बोलायचं आहे. मुलाखत पाहिली असेल त्याने कदाचित. जर पाहिली नसेल तर त्याला मुलाखत बघायला सांग. मॅटर क्लोज करायचं असेल तर त्याच्याशी बोलू दे. फेस-टू-फेस करायचं असेल तर तसंही सांग. आता वेळ होता म्हणून माहिती दिली आहे, पुढच्या वेळी झटकाच मिळेल.’
या ई-मेलनंतर सलमानच्या मॅनेजरने मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीरता पाहून पोलिसांनी IPC च्या कलम 506 (2), 120 (B), 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. त्याचसोबतच सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला तुरुंगातून धमकी दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्सने 1998 मधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमानकडे माफीची मागणी केली. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्याने दिला. सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, असं लॉरेन्स म्हणाला.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या वडिलांना धमकीचं पत्र मिळालं होतं. ‘तुमचाही मुसेवाला करू’ अशी धमकी त्या पत्रातून देण्यात आली होती. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानची रेकी तीन जणांनी केली होती. त्यापैकी कपिल पंडितला पोलिसांनी अटक केली होती.
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांकडून त्याला परवाना देण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहेत. दिल्ली पोलिसांनी सलमानच्या धमकीप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचीही चौकशी केली होती. मात्र त्याने साफ नकार दिला होता