खड्ड्यात जा.. म्हणणाऱ्या अश्नीरची सलमानने घेतली शाळा; म्हणाला “स्वत: हिरो बनण्याचा..”

| Updated on: Nov 18, 2024 | 1:07 PM

'बिग बॉस 18'चा 'वीकेंड का वार' एपिसोड चांगलाच चर्चेत आला आहे. या एपिसोडमध्ये 'भारत पे'चा सहसंस्थापक अश्नीर ग्रोवरने हजेरी लावली होती. यावेळी सलमानने त्याची चांगलीच शाळा घेतली. एका पॉडकास्टमध्ये अश्नीरने सलमानबद्दल कथित वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

खड्ड्यात जा.. म्हणणाऱ्या अश्नीरची सलमानने घेतली शाळा; म्हणाला स्वत: हिरो बनण्याचा..
Ashneer Grover and Salman Khan
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस 18’च्या नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानने ‘शार्क टँक इंडिया’चा परीक्षक आणि ‘भारत पे’चा सहसंस्थापक अश्नीर ग्रोवरची चांगलीच शाळा घेतली. एका पॉडकास्टमध्ये अश्नीरने सलमानबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता अश्नीरने ‘बिग बॉस 18’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये हजेरी लावताच सलमानने त्याला प्रतिप्रश्न करण्याची संधी सोडली नाही. सोशल मीडियावर दोघांच्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये अश्नीर स्टेजवर येताच सलमान त्याला विचारतो, “अच्छा तुम्ही आहात? तुम्ही तुमच्या दुटप्पी डायलॉगसाठी ओळखले जाता.” त्यावर अश्नीर म्हणतो, “ओळख तर आता तशीच बनली आहे.”

जेव्हा ‘भारत पे’च्या टीमने त्यांच्या पोर्टलचा ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी सलमानशी संपर्क साधला तेव्हाचा संदर्भ देत सलमान अश्नीरला म्हणाला, “तुम्ही भारत पेमध्ये असताना माझ्याबद्दल आणि माझ्या टीमबद्दल बोलताना मी ऐकलं. माझी तर तुमच्याशी कधी भेटसुद्धा झाली नव्हती.” सलमानने जुना विषय काढताच अश्नीर काही सेकंदासाठी गोंधळतो आणि पुढे उत्तर देतो, “त्यात एका एजन्सीचा सहभाग होता.” त्यावर सलमान म्हणतो, “त्यात कोणत्याही एजन्सीचा समावेश नव्हता. माझी टीम सहभागी होती. ते अशा पद्धतीने बोलत नाहीत. तुम्ही सांगितलं की माझ्याशी करार केलाय. सर्व आकडेसुद्धा चुकीचे सांगितले. मग हा दुटप्पीपणा काय आहे?” यावर अश्नीर त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही सलमान त्याला म्हणतो, “हा दुटप्पीपणाच झाला ना. कारण हा संवाद.. आपण याआधी कधी भेटलोही नाही.”

हे सुद्धा वाचा

सलमानची भेट घेतल्याबद्दल अश्नीर ठाम होता. पण अभिनेत्याने कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. अखेर हा वाद संपवण्यासाठी अश्नीर सांगतो, “मला हे स्पष्ट करायचं आहे की तुला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणं हा माझा सर्वांत चांगला निर्णय होता.” तरीही सलमान अश्नीरचं ऐकत नाही. वादाबद्दल सलमान म्हणतो, “कृपया स्पष्टीकरण द्या कारण त्या रकमेत आमच्याकडून होकार मिळवून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवलं, असा तुमचा समज होता. ते चुकीचं होतं. हा जो ॲटिट्यूड आहे, तो तिथे दिसला नव्हता.”

संबंधित पॉडकास्टमध्ये माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं अश्नीर स्पष्ट करतो. अखेर सलमान सांगतो की याप्रकरणी त्याला वाईट वाटलं नाही मात्र अश्नीरने काळजीपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत. कारण एखादं वक्तव्य त्याला महागात पडू शकतं, असं सलमान म्हणाला. “मला फक्त एवढंच माहीत होतं की तुम्ही बिग बॉसमध्ये येत आहात. मला तुमचं नावसुद्धा माहीत नव्हतं. मी तुमचे व्हिडीओ पाहिले होते आणि मला प्रश्न पडला की ही व्यक्ती कोण आहे? काय बोलतोय? अर्थातच जेव्हा तुम्ही टीव्हीवर असता तेव्हा तुम्ही सर्वकाही फुलवून बोलता. तुम्ही स्वत: हिरो बनण्याचा प्रयत्न करता आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. हे ठीक आहे पण एखाद्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी करू नका. त्या क्लिपमधून मला हेच दिसलं होतं. तुम्ही त्या क्लिपमध्ये एका वेगळ्याच ‘स्वॅग’मध्ये बोलत होता. कधीकधी अतिआत्मविश्वासामुळे असं होतं”, अशा शब्दांत सलमान अश्नीरची शाळा घेतो.

नेमकं काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी एका पॉडकास्टमध्ये अश्नीरने सलमानबद्दलचा एक अनुभव सांगितला. तो म्हणाला, “त्याला आम्ही स्पॉन्सर म्हणून ठेवलं होतं. त्याच्याच एका शूटसाठी मी त्याला भेटलो होते. कंपनीबद्दल माहिती देण्यासाठी मी गेलो होतो. तीन तास मी त्याच्यासोबत बसून होतो. त्याच्या मॅनेजरने सांगितलं की फोटो काढू नका, सरांना थोडं वाईट वाटतं. मी म्हटलं फोटो नाही काढणार, खड्ड्यात जा तू. अशी कोणती हिरोपंती असते?” यावरूनच सलमानने अश्नीरसमोर राग व्यक्त केला.