कलाविश्वात सौंदर्य आणि दिसण्याला प्रचंड महत्त्व असतं. म्हणूनच सेलिब्रिटी त्यांच्या आरोग्यावर आणि दिसण्यावर अधिक भर देतात. फिटनेस, योग, डाएट, स्कीनकेअर या त्यांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या बाबी असतात. स्वत:चं सौंदर्य आणि तारुण्य जपण्यासाठी ते बोटॉक्स, स्कीन टाइटनिंग यांसारखे आधुनिक ट्रिटमेंटसुद्धा घेतात. काही सेलिब्रिटींचं वय वाढलं की चेहऱ्यावरील तेज हरपल्याचंही पहायला मिळतं. बॉलिवूडमधील काही आघाडीचे सेलिब्रिटी त्यांच्या म्हातारपणी कसे दिसतील, याची कल्पना तुम्ही कधी केली का? त्यांचं म्हातारपणातील लूक दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खानपासून करीना कपूरपर्यंत काही सेलिब्रिटींचे चेहरे पहायला मिळत आहेत. म्हातारपणात ते कसे दिसतील, याची झलक या व्हिडीओत पहायला मिळत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
वृद्धापकाळापासून कोणीच वाचू शकत नाही. प्रत्येकालाच त्या टप्प्याला सामोरं जावं लागतं. मात्र वयाआधीच म्हातारपण चेहऱ्यावर दिसू नये यासाठी सेलिब्रिटींचा सर्व आटापिटा असतो. पार्ट्यांपासून एअरपोर्ट लूकपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण पिक्चर परफेक्ट कसं दिसू, याचा ते विचार करतात. मात्र वयाची रेष कधी ना कधी चेहऱ्यावर दिसून येतेच. कायम झगमगत्या विश्वात वावरणाऱ्या या सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या, तर ते कसे दिसतील, याची कल्पना आपण हा व्हिडीओ पाहून करू शकतो. यात सलमान खान, करीना कपूर, अभिषेक बच्चन, काजोल, डिंपल कपाडिया यांसारखे सेलिब्रिटी पहायला मिळत आहेत. त्यांचे फोटो एडिट करून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री करीना कपूरचा चेहरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. करीना तिच्या म्हातारपणी फारच विचित्र दिसेल, असं नेटकरी म्हणत आहेत. तर करीनाच्या चेहऱ्याचं एडिटिंग व्यवस्थित केलं नाही, म्हणून ती अशी दिसत आहे, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे. सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांचे चेहरेसुद्धा थक्क करणार आहेत. सलमान खान म्हातारपणीही खूप चांगला दिसेल, असं चाहत्यांनी म्हटलंय.