Baba Siddique Death: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या दसऱ्याच्या दिवशी प्राणघातक हल्ला केल्यामुळे हत्ये मागील कारण नक्की काय होतं? असे अनेक प्रश्न जनतेने उपस्थित केले आहे. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा थेट संबंध अभिनेता सलमान खान याच्यासोबत असल्याचं सांगितलं जात आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान फार खास मित्र होते आणि याच मैत्रीची किंमत बाबा सिद्दीकी यांना मोजावी लागली… अशी माहिती देखील समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तीन आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केलं आहे. तर, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. करनैल हरियाणा आणि धर्मराज यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती दिला आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन आरोपींना ठेवण्यात आलं असून, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून बाबा सिद्दीकी यांच्या घराची रेकी करत होते. सांगायचं झालं तर, लॉरेंस बिश्नोईचा खास व्यक्ती रोहित गोदारा याने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. ‘सलमान खान याचा मित्र आमचा शत्रू…’, याच कारणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली का? अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची चांगली मैत्री होती. रमजान आणि इफ्तार पार्टीमध्ये देखील अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. बाबा सिद्दीकी यांनी अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यासोबत खास मैत्री होती.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगितलं जात. कारण सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध बिश्नोई गँगशी आहे. गुंड बिश्नोई याने सलमान खान याला देखील अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे सलमान खान याच्या ‘बिग बॉस 18’ शोची शुटिंग देखील थांबवण्यात आली आहे. शिवाय सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खान याच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.