मुंबई: अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवघ्या 26 सेकंदांच्या या टीझरमध्ये फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेतील विकीच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची झलक पहायला मिळतेय. विशेष म्हणजे यात विकीचा चेहरा पहायला मिळत नाही. मात्र त्याची चाल पाहून दमदार व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लगेच येतो.
मेघना गुलजारचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट वर्षभराने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये विकीसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुख्य भूमिका साकारतेय. सॅम माणेकशॉ यांच्या पत्नी सिल्लो यांची भूमिका ती साकारतेय.
याचसोबत फातिमा सना शेख ही दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘दंगल’ची जोडी म्हणजेच सान्या आणि फातिमा एकत्र काम करणार आहेत.
भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची युद्धातील दमदार कामगिरी चित्रपटात पहायला मिळणार आहे. फिल्ड मार्शल पदावर बढती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. 1971 च्या भारत-पाक युद्धातील त्यांच्या लष्करी विजयामुळे बांगलादेशची निर्मिती झाली.
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात विकी, सान्या आणि फातिमाशिवाय नीरज काबी, एडवर्ड सॉननब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकीब अयुब आणि कृष्णकांत सिंग बुंदेला यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि विकी कौशल यांनी याआधी ‘राजी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये विकीने आलिया भट्टच्या पतीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.