मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने काही काळासाठी चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. अभिनेता विजय देवरकोंडासोबतचा तिचा ‘कुशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कामातून ब्रेक घेतला. यादरम्यान समंथासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. जवळच्याच एका व्यक्तीने समंथाची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे तिला कोट्यवधी रुपयांचा नुकसान सोसावा लागला आहे. याप्रकरणी अद्याप समंथाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ज्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाची फसवणूक केली होती, त्याच व्यक्तीकडून समंथाची फसवणूक झाल्याचं कळतंय.
समंथाचं काम गेल्या बऱ्याच वर्षांपासून तिचा एक मॅनेजर सांभाळतोय. या मॅनेजरवर ती डोळे झाकून विश्वास ठेवायची. मात्र त्यानेच समंथाची फसवणूक केल्याचं समजतंय. समंथाच्या या मॅनेजरने तिचे काही फंड्स चुकीच्या पद्धतीने हाताळले आणि त्यामुळे तिला एक कोटी रुपये गमवावे लागले आहेत. या घटनेनंतर समंथाची मॅनेजरसोबत बाचाबाचीही झाली. याआधी रश्मिकाच्या मॅनेजरने तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर तिने त्या मॅनेजरला ताबडतोब कामावरून काढून टाकलं होतं.
नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर काही महिन्यांनी समंथाने तिला मायोसिटीस आजार असल्याचं जाहीर केलं. या आजारावर तिने परदेशात जाऊन उपचार घेतले. भारतात परतल्यानंतर तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप ठरला. यादरम्यान समंथा जेव्हा जेव्हा मीडियासमोर आली, तेव्हा तिच्या दिसण्यावरून आणि आरोग्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली. अखेर विजय देवरकोंडासोबतच्या ‘कुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तिने ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
समंथा आणि नाग चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या चार वर्षातच विभक्त होत त्यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर समंथा तिच्या करिअरवर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसतेय. तर दुसरीकडे नाग चैतन्यचं नाव अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत जोडलं जात आहे.