हैदराबाद : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतींमध्ये समंथा तिच्या आजारपणाविषयी आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथाने मायोसिटीसवरील उपचार आणि त्यानंतर शरीरावर झालेल्या परिणामांबद्दल सांगितलं. मायोसिटीस या ऑटो इम्युन आजारामुळे समंथाने गेल्या वर्षी काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला या आजाराचं निदान झालं आणि त्यानंतर तिने उपचारासाठी ब्रेक घेतला. उपचारानंतर समंथा आता पुन्हा कामावर परतली आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत समंथाने मायोसिटीसच्या परिणामांविषयी सांगितलं. “एक कलाकार म्हणून तुम्ही प्रत्येक ठिकाणी परफेक्शन दाखवाल, अशी अपेक्षा असते. इन्स्टाग्रामवर, चित्रपटांमध्ये तुम्ही परफेक्ट दिसलं पाहिजे, अशी चाहत्यांची अपेक्षा असते. मी जशी आहे तसंच स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. नेहमीच मी चांगली दिसण्याच्या आणि चांगलं काम करण्याच्या प्रयत्नात असायचे. अखेर आता माझ्यावर अशी वेळ आली आहे की माझाच माझ्या परिस्थितीवर नियंत्रण नाही”, असं ती म्हणाली.
“एके दिवशी माझ्या चेहऱ्यावर सूज यायची, कधी शरीरावर जडपणा जाणवायचा तर कधी मी आजारी असायची. मी कशी दिसायचे यावर माझं नियंत्रण नव्हतं. अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुमचे डोळे भावना व्यक्त करण्याचं माध्यम असतात. पण सकाळी उठल्या उठल्या माझ्या डोळ्यांवर मुंग्या आल्यासारखं वाटायचं. डोळ्यांना अधिक प्रकाश सहन होत नाही. मी फक्त स्टाइलसाठी चष्मा वापरत नाही. तर प्रकाशाचा डोळ्यांना खूप त्रास होतो, म्हणून चष्मा वापरावा लागतोय. मला तीव्र मायग्रेनचा त्रास आहे आणि माझ्या डोळ्यांतही खूप वेदना जाणवतात. वेदनांमुळे त्यांना सूज येते आणि गेल्या आठ महिन्यांपासून हे सुरू आहे. एका अभिनेत्यासोबत घडलेली ही सर्वांची वाईट गोष्ट असू शकते”, असंही ती पुढे म्हणाली.
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.
शाकुंतलम या चित्रपटात समंथा शकुंतलाची भूमिका साकारतेय. शकुंतला ही मेनका आणि विश्वमित्रा यांची कन्या असते. या चित्रपटात मोहन बाबू, प्रकाश राज, अदिती बालन, गौतमी, अनन्या नागल्ला, कबीर दुहन सिंह यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे अभिनेता अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू आऱ्हा या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. येत्या 14 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.