हैदराबाद : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या करिअरमधील पहिलावहिली आयटम साँग केला. ‘ऊ अंटावा’ हे तिचं गाणं तुफान गाजलं. आजही पार्ट्यांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. मात्र समंथाचे कुटुंबीय, जवळचे मित्रमैत्रिणी आणि शुभचिंतकांनी तिला हे गाणं न करण्याचा सल्ला दिला होता. नाग चैतन्यसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर लगेचच तिला ही ऑफर मिळाली होती. म्हणूनच घटस्फोटानंतर लगेच तिने असं काही करू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समंथा मोकळेपणे व्यक्त झाली.
नाग चैतन्य आणि समंथा रुथ प्रभूने ऑक्टोबर 2021 मध्ये घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये जेव्हा समंथाने हजेरी लावली होती, तेव्हा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया हा कडवटपणाचा अनुभव देणारा होता, असं ती म्हणाली.
समंथा सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत समंथा तिच्या घटस्फोटाविषयी व्यक्त झाली. “मला जेव्हा ऊ अंटावाची ऑफर मिळाली, तेव्हा माझ्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. जेव्हा घटस्फोट जाहीर केला, तेव्हा प्रत्येक कुटुंबीय आणि शुभचिंतक म्हणत होते की, तू घरी बस, पण कोणत्याही आयटम साँगची ऑफर स्वीकारू नकोस. मला ज्या मित्रमैत्रिणींनी नेहमीच प्रोत्साहन दिलं, त्यांनीसुद्धा मला आयटम साँग करण्यास साफ नकार दिला होता. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते”, असं ती म्हणाली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी का लपून बसावं, असा प्रश्न मला पडला. मी काहीच चुकीचं केलं नव्हतं. सर्व ट्रोलिंग, टीका-टिप्पणी आणि द्वेष शांत झाल्यानंतर मी हळूहळू डोकं वर काढावं, जणू मी काही गुन्हाच केला होता, हे सर्व मला पटणारं नव्हतं. त्यामुळे मी माझं काम करत राहणार होते. मी माझ्या लग्नाला 100 टक्के दिले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यासाठी मी स्वत:ला दोषी ठरवू शकत नव्हते. जे मी केलंच नाही त्यासाठी स्वत:च्या मनात अपराधीपणाची भावना आणणार नव्हते.”
समंथाने तिच्या करिअरमध्ये कधीच आयटम साँग केला नव्हता. त्यामुळे ‘ऊ अंटावा’ या गाण्याचा अनुभव तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होता. “मला गाण्याच्या ओळी आणि त्याची संपूर्ण कोरिओग्राफी खूप आवडली होती. मी कधीच आयटम साँग केलं नव्हतं आणि विविध भूमिका साकारण्यावर माझा कायम भर होता. मी त्या गाण्याकडे आयटम साँग म्हणून नाही तर एका वेगळ्या भूमिकेच्या दृष्टीने पाहिलं”, असा अनुभव तिने सांगितलं.