हैदराबाद: अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमातील समंथाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मायोसिटीस या आजारावर उपचार घेत होती. या आजारपणानंतर ती पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. आजारपणामुळे समंथाच्या चेहऱ्यावरील तेज हरपलंय, अशी कमेंट एका चाहत्याने तिच्या या फोटोंवर केली. त्यावर समंथानेही त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘समंथासाठी वाईट वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि व्यक्तीमत्त्वातील जादुईपणा हरवलं आहे. जेव्हा प्रत्येकाला वाटलं की ती घटस्फोटातून सावरली आणि व्यावसायिक आयुष्यात आणखी पुढे जाऊ लागली, तेव्हा मायोसिटीस या आजाराने तिला पुन्हा कमकुवत बनवलं’, अशी पोस्ट ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना समंथाने लिहिलं, ‘मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्यासारखं अनेक महिने उपचार आणि औषधांचा त्रास सहन करावं लागू नये.. आणि तुमचं तेज वाढवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला प्रेम’. समंथाच्या या उत्तरानंतर चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आणि तिच्याबद्दल अशी पोस्ट लिहिणाऱ्याला फटकारलं.
‘ऑटोइम्युन आजाराचा सामना करणाऱ्यांना ढीगाने स्टेरॉइड्स आणि प्रायोगिक उपचार घ्यावे लागतात. या आजारपणाचे आणि उपचारांचे परिणाम सर्वसामान्यपणे चेहऱ्यावर दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या निंदनीय टिप्पण्या क्रूर वाटू शकतात. मला अशा लोकांबद्दल वाईट वाटतं जे एखाद्या व्यक्तीच्या शांत स्वभावातील ताकद पाहू शकत नाहीत’, असं एका युजरने लिहिलं.
I pray you never have to go through months of treatment and medication like I did ..
And here’s some love from me to add to your glow ? https://t.co/DmKpRSUc1a— Samantha (@Samanthaprabhu2) January 9, 2023
समंथाने या कमेंटचीही दखल घेतली. ‘जिथे तुम्ही काहीही असू शकता अशा जगात दयाळू व्हा’, असं तिने लिहिलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये समंथाने तिला मायोसिटीस आजार असल्याचा खुलासा केला होता.
मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.